||श्रीराम समर्थ||

श्री समर्थ रामदासस्वामी महाराजकृत
मनाचे श्लोक
(सार्थ शुद्ध पाठावृत्ति)




श्री समर्थ सेवा मंडळ (रजि)
मु. पो. सज्जनगड जि. सातारा - ४१५०१३
(महाराष्ट्र)






भूमिका

श्रीसमर्थ रामदासस्वामी महाराजकृत प्रसिध्द 'मनाचे श्लोक' म्हणजे मराठी भाषेतील गीताच होय. बालमनावर संस्कार करण्यासाठी, प्रौढांना समयी योग्य मार्गदर्शनासाठी व वृद्धांना सहानुभूतीपूर्वक दिलासा देऊन अंतिम हितसाधनास प्रवृत्त करण्यासाठी - असा विविध तऱ्हेने या मराठी गीताचा उपयोग घरोघरी होत आहे. श्रीमद्भग्वद्गीतेप्रमाणे या मराठी गीतेवर ही भाष्ये रचिली गेली पाहिजेत.

पूर्वी सर्वश्री कै. स.भ.शं.श्री. देव, ल.रा. पांगारकर, देवस्थळी, गुणाजी आदि विद्वान भक्तांनी आपापल्या दृष्टिकोनातून 'मनाच्या श्लोक' चे विवरण केले आहे. ती पुस्तके आज बहुतांशी अप्राप्य झाली आहेत.

श्रीसमर्थांसारखे संत हे अगोदर साधनमार्गाने संतत्व पावले व नंतर कार्यास लागले. निवृत्तीचा पाया पक्का झाल्याविना जर प्रवृत्तीचा उपदेश झाला तर कशी अनावस्था निर्माण होते हे आपल्या देशाकडे वरवर दृष्टि टाकली तरीहि सहज कळून येण्यासारखे आहे. म्हणून साधकांना आधी निवृत्तीचाच योग्य उपदेश केला पाहिजे. या दृष्टीने 'मनाचे श्लोकां' चा अर्थ असलेल्या पुस्तकाची नितांत आवश्यकता होती.

श्रीरामकृष्ण आश्रम - नागपूरचे श्रीमत् स्वामी राकानंद यांनी या पुस्तकात अध्यात्मवादी अर्थ देऊन ही गरज यथामति पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. श्री स्वामीजी हे अनुभववृद्ध व वयोवृद्धहि आहेत.

अल्प मूल्यात श्रीसमर्थ वाड्मय प्रसिद्ध करण्याच्या योजनेनुसार याहि पुस्तकाचे प्रकाशन श्री समर्थ सेवा मंडळाने केले आहे. ग्रंथाच्या शेवटी श्लोक सूची दिल्याने संदर्भ शोधनास मदत होईल असे वाटते. श्लोकाचे पाठ मंडळाने प्रसिद्ध केलेल्या शुद्ध पाठावृत्तीप्रमाणे घेतले आहेत.

आत्मारामाय दासाय केवालाद्वैतबोधने |
प्रेमाय रामरुपाय श्रीसमर्थाय ते नमः ||
-मारुतीबुवा रामदासी






||जय जय रघुवीर समर्थ ||

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ||
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा |
गमू पंथ आनंत या राघवाचा ||१||

जो सर्व गणांचा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश या भूतगणांचा; शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयगणांचा; तसेच पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये व अंतःकरण पंचक या अंतर्बाह्य इंद्रिय गणांचा अधिष्ठाता आणि अधिनायक म्हणून गणाधीश असून तो सर्व गुणांचा म्हणजे सत्व, रज, तमादी त्रिगुणांचा ईश म्हणजे मूळ नियामक होय. तोच मुळारंभ म्हणजे सगुणनिर्गुणस्वरूप शिवाच्या सृष्टी कर्तृत्वाचा प्रथमाविष्कार व सगुणनिर्गुणस्वरूप परमात्मप्रीत्यर्थ ओमकाररूप उपासनेचा जो आरंभ आहे. त्याला, आणि परा, पश्यंती, मध्यम, वैखरी या चारी वाणींची मूळ कारणावस्था अशी त्या गणेशाची शक्तिस्वरूपिणी जी देवी शारदा तिला नमन करून अनाद्यनंत परब्रह्मस्वरूप राघवाचा अनंताकडे नेणारा मार्ग धरू या. ||१||

मना सज्जना भक्तिपंथेंचि जावें |
तरी श्रीहरी पाविजेतों स्वभावें ||
जनीं निंद्य तें सर्व सोडून द्यावें |
जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ||२||

हे सज्जन मना; (सत्स्वरूप जो परमात्मा तेथूनच तुझा उदय होतो म्हणून तू खऱ्या अर्थाने सत्-जन आहेस), तू भक्तिमार्गाने म्हणजे भगवत् प्रेमाचे सूत्र धरून जीवन जगावेस; यामुळे अगदी स्वाभाविकपणे श्रीहरीलाच पावशील त्याकरता प्रथमतः जन साधारणांमध्ये जे जे निंद्य समजले जाते ते आचरण सोडून द्यावे आणि जे जे जगन्मान्य गणले आहे तेच वर्तन सर्वतोभावे आचरीत जावे. ||२||

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा |
पुढें वैखरी राम आधीं वदावा ||
सदाचार हा थोर सोडूं नये तो |
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ||३||

सुप्रभाती श्रीरामांचे चिंतन करून (श्रीराम चिंतनाची पद्धति पुढे श्लोक ६७ ते ७७ मध्ये स्पष्ट केली आहे) नंतर मुखाने रामनामोच्चारण करीत जावे. तसेच सदाचाराची महती ओळखून तो सोडू नये. अशा रीतीने विचार, उच्चार आणि आचारात एकवाक्यता निर्माण झाली की माणसांचे जीवन धन्य होते. ||३||

मना वासना दुष्ट कामा न ये रे |
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ||
मना सर्वथा नीति सोडूं नको हो |
मना अंतरीं सार वीचार राहो ||४||

हे मना, दुसऱ्याचा दुष्टावा करण्याची दुष्ट वासना कामाची नाही. पापाचरणाला प्रवृत्त करणारी पापबुद्धीहि धरिता कामा नये. जगात वागताना धर्मयुक्त नीतीनियमांचेहि उल्लंघन करू नये आणि त्याबरोबरच चित्तात जीवनाचे सारतत्व, परमात्मतत्व, नित्य जागृत असू द्यावे. ||४||

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा |
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ||
मना कल्पना ते नको वीषयांची |
विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ||५||

हे मना, पापाचरणाला प्रवृत्त करणारी पापबुद्धी आणि तिची पूर्वावस्था म्हणजे पापसंकल्प तो नीट ओळखून, निर्मूलन करून, सत्यस्वरूप जो परमात्मा त्याच्या प्राप्तीचा संकल्प जो सत्यसंकल्प तो जिवाभावाने दृढपणे हृदयी ठाम असू दे. मना, विषयांची अंधुकशी कल्पनाहि निपटून टाकावी. कारण तिच्यामुळे मन विकारवश होऊन पुढील अनर्थ परंपरा ओढवते आणि जगात छिः थू होते. ||५||

नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको रे मना काम नाना विकारी ||
नको रे मना सर्वदा अंगिकारू |
नको रे मना मत्सरू दंभ भारू ||६||

हे मना, खेदाला कारण होणारा क्रोध येऊ देऊ नको. नाना तऱ्हेचे विकार निर्माण करणारा कामहि चित्तात निपजू देऊ नको. तसेच मद, मत्सर आणि भारवाही दम्भालाहि थारा देऊ नको. ||६||

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे |
मना बोलणे नीच सोशीत जावे ||
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |
मना सर्व लोकांसि रे नीववावे ||७||

बा मना, परमात्मप्राप्तीकरिता लागणारे श्रेठ प्रतीचे धैर्य हृदयी धारण कर! क्षुद्रपणाने कोणी टाकून बोलल्यास तेही शांतपणे सहन करावे आणि स्वतः मात्र सदासर्वदा नम्रतेनेच वागावे व बोलावे अशा रीतीने सर्वांच्या अंतःकरणाला संतोष द्यावा. ||७||

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ||
मना चंदनाचे परी त्वां झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||८||

देहापतानंतरहि मागे कीर्ती राहील अशीच, हे सज्जना मना, आपली वर्तणूक असावी. तसेच, हे मना चंदन जसे स्वतः झिजते आणि दुसऱ्याला शीतलता देते, तसेच संतसज्जनांच्या अंतःकरणाला संतोष देऊन त्यांना प्रसन्न ठेवण्याकरिता देहाला त्यांच्या सेवेच्या कष्टांनी झिजवावे. ||८||

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे |
अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे ||
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे |
न होता मनासारिखे दुःख मोठे ||९||

हे मना, दुसऱ्यांच्या द्रव्याचा अभिलाष धरू नको. (अथवा द्रव्याचा फाजील अभिलाष धरू नये; कारण ते बरोबर येत नसते. ते पुढल्या पिढीचेच असते.) अतिस्वार्थबुद्धी नसावी; कारण त्यामुळे  आपल्या पदरी पापाचा वाटा येतो. (द्रव्याचा उपभोग मात्र पुढलेच घेतात.) तसले खोटे कर्म पापाला कारण होऊन पुढे तोच कर्मभोग आपल्याला भोगावा लागतो. मनासारखे काही न घडले (स्वार्थबुद्धीने पापाचरण करूनहि जर द्रव्य जोडता आले नाही) तर त्यासारखे दारुण दुःख नाही. ||९||

सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी |
दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी ||
देहेदुःख तें सूख मानीत जावें |
विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें ||१०||

(मागील श्लोकांतील अनर्थ परंपरा टाळावयाची असेल तर हाच एकमेव उपाय आहे की) श्रीरामचंद्राच्या ठायी सदासर्वकाळ प्रीती जडवावी आणि त्यायोगे आपली आपणच दुःख कष्टापासून सुटका करून घ्यावी. पण प्रारब्धानुसार प्राप्त झालेले दुःखाचे प्रसंग मात्र सुखाने झेलावे आणि विवेकाच्या सहाय्याने सदा सत्स्वरुपी चित्त जडवून ठेवावे. ||१०||

जनीं सर्वसूखी असा कोण आहे |
विचारें मना तूंचि शोधूनि पाहें ||
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें |
तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ||११||

हे मना, आता शांतपणे विचारपूर्वक तूच शोधून पहा कि या जगात सर्वस्वी निर्भेळ सुखी असा कोणी तरी आहे का? सुखाबरोबर दुःखहि जोडलेलेच असते. मना, जसे तुझे पूर्वकर्म असेल तसेच ते पूर्वसंचिताच्या रूपाने उभे राहते आणि त्यानुसार बरा वाईट कर्मभोग भोगावा लागतो. ||११||

मना मानसी दुःख आणूं नको रे |
मना सर्वथा शोक चिंता नको रे ||
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी |
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ||१२||

(जसे पेरावे तसेच उगवते हा सृष्टीनियम लक्षात ठेवून) मनात दुःखाला थारा देऊ नकोस. आणि त्याचा व्यर्थ शोक व (हे असे कसे झाले असली) काळजीहि करीत बसू नको. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धी सोडून देऊन, विदेहीपणा बाणवून, मुक्तीसुखाचा आस्वाद घेत राहा. ||१२||

मना सांग पां रावणा काय जालें |
अकस्मात तें राज्य सर्वै बुडालें ||
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं |
बळें लागला काळ हा पाठिलागी ||१३||

हे मना, रावणाची अवस्था कशी झाली ती सांग बरे, (त्याला अविवेकामुळे) एकाएकी राज्याला (आणि जीवितालाहि) मुकावे लागले. म्हणून दुर्वासनेचा सर्वस्वी त्याग कर. मृत्युरूपी काळाचा ससेमिरा बळेच पाठीस लागलेला आहे हे सदैव ध्यानात ठेव (व वेळीच सावध हो). ||१३||

जिवा कर्मयोगें जनीं जन्म जाला |
परी शेवटीं काळमूखीं निमाला ||
महाथोर ते मृत्युपंथेंचि गेले |
कितीएक ते जन्मले आणि मेले ||१४||

आपापल्या कर्मानुसार प्रत्येक जीव या मर्त्यलोकी जन्मास आलेला आहे आणि अखेरीस तो काळाच्या दाढेत सापडून लुप्त झाला आहे. मोठमोठे थोर पुरुषहि या मृत्युपंथाने गेले आहेत. कित्येकजण तर या जन्मास आले आणि (मागे नाव निशाणीहि न ठेवता) मरून गेले. ||१४||

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी |
जितां बोलती सर्वही जीव मी मी ||
चिरंजीव हे सर्वही मानिताती |
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ||१५||

हे मना, विचार करून पाहता हि भूमी मृत्यूचीच आहे हे अगदी खरे आहे. तरीहि सारेच जीव मी मी म्हणत आपापला जिवंतपणाचा टेंभा बोलून दाखवितात, सारेच जन स्वतःला चिरंजीव समजतात; परंतु एकाएकी सारे काही येथेच सोडून, निघून जातात (त्यांना जावेच लागते). ||१५||

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे |
अकस्मात तोही पुढे जात आहे ||
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें |
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ||१६||

जो एक मरतो त्याचा दुसरा शोक करीत असतो आणि पुढे वेळ आली कि अचानकपणे तोहि मरून जातो. या लोकात माणसाला लोभ आवरत नाही; त्यामुळे मनात 'हवे हवे' चा क्षोभ सारखा वाढत असतो आणि त्यामुळेच जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ||१६||

मनीं मानवी व्यर्थ चिंता वहातें |
अकस्मात होणार होऊन जातें ||
घडे भोगणे सर्वही कर्मयोगें |
मतीमंद तें खेद मानी वियोगें ||१७||

मनुष्य मनातल्या मनात एखाद्या गोष्टीची व्यर्थ चिंता करीत असतो; पण जे घडावयाचे ते अचानकपणे घडून जातेच. जे जे सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात ते त्याच्याच पूर्वकर्मानुसार घडत असतात; पण मंदबुद्धी माणूस, हे कर्माचे तत्व समजून न घेता, वियोगजन्य दुःखाने खेद करीत बसतो. ||१७||

मना राघवेंवीण आशा नको रे |
मना मानवाची नको कीर्ति तूं रे ||
जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें |
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ||१८||

म्हणून मना, एका राघवाशिवाय दुसरी कशाचीहि आस धरू नको. मानवाची कीर्ती, स्तुती गात बसू नको. चारी वेद, सहा शास्त्रे आणि अठराहि पुराणे ज्याची स्तुतीस्तोत्रे गातात त्या प्रभुरामचंद्राचे यशोगान तू करीत राहशील तर तेच तुझ्या हिताचे होय. ||१८||

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे |
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे ||
मना सत्य ते सत्य वाचे वदावें |
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावें ||१९||

बा मना, सत्यस्वरूप जो परमात्मा त्याची कास सोडू नको; आणि मिथ्या प्रपंचाचा मांड मांडू नको. मना, ते परमात्मतत्वच एकमेव सत्य होय. त्याच सत्यस्वरुपाचे वाचेने उच्चारण करावे; आणि मना, मिथ्या असे हे जे जग, त्याचे मिथ्यत्व जाणून, त्याचा सर्वथैव त्याग करावा (अनासक्त व्हावे). ||१९||

बहू हिंपुटी होईजे मायपोटीं |
नको रे मना यातना तेचि मोठी ||
निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं |
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ||२०||

(आणि असे न करशील तर) अरे मना, मातेच्या उदरात पुनः पुनः यावे लागून मोठेच कष्टी व्हावे लागेल. नको रे मना, ती कठीण यातना भोगण्याची पाळी पुनश्च येऊ देऊ नकोस. साऱ्या बाजूंनी कोंडला गेल्यामुळे त्या गर्भवासातील बालकाला सारखे उकडावे लागते आणि त्याचे तोंड खाली असल्यामुळे त्याला अतोनात दुःख भोगावे लागते. ||२०||

मना वासना चूकवी येरझारा |
मना कामना सोडि रे द्रव्यदारा ||
मना यातना थोर हे गर्भवासी |
मना सज्जना भेटवी राघवासी ||२१||

हे मना, गर्भवासातल्या त्या घोर यातनांची जाणीव ठेवून, त्या रघुरायाची भेट व्हावी ही एकमेव वासना धर. त्याच एका सद्वासनेच्या योगाने द्रव्यदारेच्या कामनेचा त्याग कर म्हणजे मग जन्म मरणाच्या येरझाराहि तू चुकवू शकशील. ||२१||

मना सज्जना हीत माझे करावे |
रघूनायका दृढ चित्ती धरावे ||
महाराज तो स्वामि वायुसुताचा |
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ||२२||

हे सज्जना मना, जीवमात्राचा उद्धारकर्ता, त्रिभुवनाचा अधिपती आणि वायुपुत्र मारुतीचा स्वामी जो रघुपती त्या दयाळू श्रीरामरायाला चित्तात अढळपणे, अखंड धारण कर आणि माझे (स्वतःचे) हित साध, कल्याण कर. ||२२||

न बोले मना राघवेवीण काही |
मनी वाउगे बोलता सौख्य नाही ||
घडीने घडी काळ आयुष्य नेतो |
देहांती तुला कोण सोडू पहातो ||२३||

मना, त्या राघवावाचून अन्य बोलणे नको. लोकात उगाच काहीतरी वायफळ बडबड करीत राहिल्याने सुख होणार नाही. अरे, क्षणोक्षणी जसजसा काळ पुढे सरकतो तसतसे आयुष्य कमी कमी होत आहे. देहांत समयी तुला त्या राघवावाचून कोण बरे सोडवू शकेल? ||२३||

रघूनायकावीण वाया शिणावे |
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ||
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे |
अहंता मनी पापिणी ते नसो दे ||२४||

रघुनायकाविरहित जो क्षण जातो तो व्यर्थ शीण होय. अज्ञ जीवाप्रमाणे व्यर्थ का बरे बरळत असावे? म्हणून सदा सर्वदा वाचेने नामोच्चारण चालत असू दे आणि (संसृतीस कारण असणारी) ती पापिणी अहंता मनामध्ये कदापि नसू दे. ||२४||

मना वीट मानू नको बोलण्याचा |
पुढे मागुता राम जोडेल कैचा ||
सुखाची घडी लोटता सूख आहे |
पुढे सर्व जाईल काही न राहे ||२५||

बा मना, तेच ते पुनः पुनः बोलतो त्याचा वीट येऊ देऊ नको. कंटाळून जाशील तर मग पुढे कधीतरी श्रीरामाची प्राप्ती होण्याची आशा राहील का? सुखाची घडी लोटेपर्यंतच सुख वाटते. (ती संपताच पुढे दुःखच दुःख) नंतर ही सुखाची घडी समूळ नाहीशी होणार आहे; काही राहणार नाही. ||२५||

देहेरक्षणाकारणे यत्न केला |
परी शेवटी काळ घेऊन गेला |
करी रे मना भक्ति या राघवाची |
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ||२६||

देहरक्षणाचा कितीहि प्रयत्न केला तरी अखेरीस काळ त्याला घेऊन जातोच. तेव्हा मना, अन्तःकरणातली 'पुढे कसे होईल' ही सांसारिक चिंता सोडून दे आणि या रघुरायाची मनोभावे भक्ती कर. ||२६||

भवाच्या भये काय भीतोस लंडी |
धरी रे मना धीर धाकासि सांडी ||
रघूनायकासारिखा स्वामि शीरी |
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ||२७||

अनाथांचा नाथ अशा रघूनायकाचा तुझ्या मस्तकी वरदहस्त असताना, अरे भ्याडा भेदरटा, मना, या यःकश्चित संसाराची का बरे भीती बाळगतोस? असला धाक सोडून दे आणि धीर (विश्वास) धर. दंडधारी यमराज जरी कोपला तरी त्याच्याहि शीर्षस्थानी असलेला तो सर्वश्रेष्ठ स्वामी रामराय तुझी कधीहि उपेक्षा करणार नाही, हा दृढ विश्वास बाळग. ||२७||

दिनानाथ हा राम कोदंडधारी |
पुढे देखता काळ पोटी थरारी ||
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||२८||

हा कोदंडधारी श्रीराम दीनांचा कैवारी आहे. तो समोर उभा असलेला पाहून काळाच्याहि पोटात धडकी भरते "निजादासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची कधीहि उपेक्षा करीत नाही" हे जनवाक्य नितांत सत्य आहे, हे निश्चित समजून राहा. ||२८||

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ||
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||२९||

शरणागताचे रक्षण करणे हे श्रीरामरायाचे ब्रीद सर्वत्र महशूर आहे. भक्तांचे शत्रुत्व करणाऱ्याच्या डोक्यावर श्रीरामाच्या धनुष्यदंडाचा जबरदस्त प्रहार होतो. अरे, ज्या प्रभूने सर्वहि अयोध्यापुरी विमानांतून वैकुंठलोकी, साकेतधामी वाहून नेली तो निजदासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची कधीहि उपेक्षा करीत नाही. ||२९||

समर्थाचिया सेवका वक्र पाहे |
असा सर्व भूमंडळी कोण आहे ||
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||३०||

समर्थाच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहील, त्याचे अनहित करील, असा या अखिल पृथ्वीतलावर कोणीतरी असू शकेल का? अरे, ज्याची अगाध लीला त्रैलोक्यात सर्वजण गातात तो निजदासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||३०||

महासंकटी सोडिले देव जेणे |
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ||
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||३१||

महासंकटात पडलेल्या, रावणाच्या कैदेत सापडलेल्या, देवांनाहि ज्याने मुक्त केले; प्रताप, सामर्थ्यादी सर्व प्रकारच्या गुणांनी जो सर्वाहून अगदीच आगळा, विलक्षण श्रेष्ठ आहे; साक्षात देवी उमा व उमापती ज्याचे नित्य स्मरण करीत असतात, तो निजदासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||३१||

अहल्या शिळा राघवे मुक्त केली |
पदी लागता दिव्य होऊनि गेली ||
जया वर्णिता शीणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||३२||

शिलेसारखी जडमूढ, स्तब्ध झालेल्या अहल्येला प्रभू रामचंद्रांनी दुःखातून मुक्त केली व ती त्यांच्या चरणांचा आश्रय घेताच दिव्यता पावली. ज्याच्या सत्यस्वरुपाचे वर्णन करता करता वेदवाणीहि नेति नेति म्हणत थकली तो निजदासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||३२||

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला |
शशी सूर्य तारांगणे मेघमाळा ||
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||३३||

ज्याच्या सृष्टीलीलेत मेरू मांदारादी अजस्त्र पर्वत बसतात आणि ज्याच्या सत्तेने सूर्य, चंद्र, तारांगण व मेघमाला आदी नियमित चालतात आणि ज्याने बिभीषण व हनुमान या दोघा भक्तांना कृपेने चिरंजीव करून ठेवले तो निजदासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||३३||

उपेक्षा कदा रामरूपी असेना |
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ||
शिरी भार वाहेन बोले पुराणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||३४||

त्या रामरुपामध्ये उपेक्षेला स्थानच नाही; पण अज्ञ मानवी जीवांच्या अंतःकरणात निश्चयपूर्वक विश्वास बसत नाही. अरे मना, थोडा विचार करून बघ. ज्याने भक्तांचा भार शिरावर वाहून त्यांना मुक्त करण्याचे आश्वासन दिल्याची अनेक पुराणामध्ये प्रत्यक्ष उदाहरणे आहेत, तो निजदासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||३४||

असे हो जया अंतरी भाव जैसा |
वसे हो तया अंतरी देव तैसा ||
अनन्यास रक्षीतसे चापपाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||३५||

ज्याचा जसा भाव असतो तसाच त्याच्या अंतर्यामी देव प्रतीतीस येत असतो. अनन्य शरणागतांचे रक्षण तो धनुर्धारी प्रभू रामचंद्र सदा सर्वदा करीतच असतो (किंबहुना यासाठीच त्याने शस्त्रे धारण केलेली आहेत). असा तो निजदासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||३५||

सदा सर्वदा देव सन्नीध आहे |
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ||
सुखानंद आनंद कैवल्यदानी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||३६||

सदा सर्वकाळ तो देव आगदी जवळ, आपल्या हृदयातच असतो. तो कृपाळूपणाने भक्ताच्या धैर्याची थोडीशी कसोटीहि पाहतो. पण एवढे मात्र खरे कि, तो सुखस्वरूप, आनंदस्वरूप, मोक्षदाता प्रभू रामचंद्र  निजदासांचा कैवारी असल्याने आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||३६||

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ||
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ||३७||

(रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने वेगळे पडलेल्या) चक्रवाक पक्षांच्या दाम्पत्याला विरह दुःखातून मुक्त करण्याकरिताच जसा सूर्योदय होतो, तसाच संकटसमयी उडी घालून, धावून येऊन, तो आर्तत्राता प्रभू रामराय भक्ताला संकटातून मुक्त करतो. असा हरीभक्तिचा दुंदुभी, नगारा (निस्साण) वेदशास्त्र पुराणांतून सारखा पिटला जात आहे, गर्जत आहे. तेव्हा हे हृदयात ठामपणे कोरून ठेवावे की) तो निजदासांचा कैवारी श्रीराम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. (तात्पर्य आपण श्रद्धावंत भक्त झाले पाहिजे.) ||३७||

मना प्रार्थना तूजला एक आहे |
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ||
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||३८||

हे सज्जना मना, आता तुला हीच प्रार्थना आहे की, विषयचिंतन थांबवून, थक्कीत करून, श्रीरघुरायाकडे दृष्टी वळव. (कानांनी त्याचे गुण ऐक, वाचेने नामसंकीर्तन कर, चित्ताने त्याचेच चिंतन कर व बुद्धीने असा निश्चय कर की एक रामरायच सत्य होय, इतर सर्व काही मिथ्या होय. आणि मग अंतर्यामी ते दिव्य दर्शन घेण्याने थक्क होऊन जाशील.) या माझ्या विनवणीचा कधीहि अव्हेर न करता त्या अंतर्यामी श्री राघवाच्या ठायी कायमचा निवास करून रहा. ||३८||

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे |
जयाचेनि योगे समाधान बाणे ||
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||३९||

हे मना, अरे, वेदशास्त्रे पुराणे ज्याच्या स्वरूपाचे नाना प्रकारांनी वर्णन करतात, ज्याच्या चिंतनाने चित्तात समाधान बाणते त्या राघवाचे ठायी आपली सारी चंचलता समर्पित करून, तेथेच कायमचा निवास करून रहा. ||३९||

मना पाविजे सर्वही सूख जेथे |
अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ||
विवेके कुडी कल्पना पालटीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||४०||

मना, ज्याच्या ठायी सर्व सुखाची पूर्ती होते त्या रघुनाथचरणीच अत्यादरपूर्वक सारे लक्ष जडवून ठेव. विवेकाची कास धरून अंतःकरणातील साऱ्या अशुद्ध कल्पना पालटून शुद्ध कर आणि त्या अंतर्यामी श्रीराघवाच्या ठायी कायमचा निवास करून रहा. ||४०||

बहू हिंडता सौख्य होणार नाही |
शिणावे परी नातुडे हीत काही ||
विचारे बरे अंतरा बोधवीजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||४१||

हे मना, मनस्तरंगाच्या घोड्यावर स्वार होऊन कितीहि हिंडत राहिलास तरी तू सुखी होणार नाहीस. फुकटचा शीण आणि हिताच्या नावाने शून्य! तेव्हा शुद्ध विचाराच्या योगाने चित्ताला बोध कर आणि त्या अंतर्यामी श्रीराघवाच्या ठायी कायमचा निवास कर. ||४१||

बहुतांपरी हेचि आता धरावे |
रघूनायका आपुलेसे करावे ||
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे |
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||४२||

दुसऱ्या अनेक भक्तांप्रमाणे तूहि रघुनायकाला आपलासा करून ठेवावा हेच एक तत्व चित्तात ठामपणे धरून ठेव. त्या प्रभू रामरायाच्या तोडरी म्हणजे पद्मभूषणांच्या निनादामध्ये तो 'दिनाचा कैवारी' आहे हेच त्याचे स्वभावसिद्ध ब्रीद त्रिखंडात गाजत आहे. हे लक्षात ठेवून त्या अंतर्यामी राघवाच्या ठायी कायमचा निवास करून रहा. ||४२||

मना सज्जना एक जीवी धरावे |
जनीं आपुले हीत तुवां करावे ||
रघूनायकावीण बोलो नको हो |
सदा मानसी तो निजध्यास राहो ||४३||

हे सज्जना मना, 'या मर्त्यलोकी येऊन मोक्षरुपी स्वहित साधावे हेच आपले मुख्य कर्तव्य होय' हे एक तत्व जिवाभावाने ध्यानात ठेव. ते साधण्याकरिता एका रघुनायकाशिवाय अन्य गोष्टींचे वाचेने उच्चारणहि  करू नको आणि हाच एक निदिध्यास मनात जागृत असू दे. ||४३||

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी |
कथा आदरे राघवाची करावी ||
नसे राम ते धाम सोडूनि द्यावे |
सुखालागि आरण्य सेवीत जावे ||४४||

अरे मना, इहलोकींच्या गोष्टीसंबंधी मौन धारण करावे, पण राघवाची कथा मात्र अत्यादरपूर्वक करीत जावी. ज्या ठिकाणी रामभक्ती नाही ते घर वर्ज्य करून आत्मसुखाप्रीत्यर्थ एकांतवास सेवावा. ||४४||

जयाचेनि संगे समाधान भंगे |
अहंता अकस्मात येऊनि लागे ||
तये संगतीची जनीं कोण गोडी |
जिये संगतीने मती राम सोडी ||४५||

(रामभक्ती नसलेले घर का वर्ज्य करावे?) अरे, ज्याच्या संगतीत आपले समाधान बिघडते आणि प्रसंगवशात मीपणा उफाळून येतो, ज्या संगतीने रामाभिमुख असलेली अंतःकरणवृत्ती रामविन्मुख होते त्या संगतीची मातब्बरी ती कसली? तीत गोडी ती कसली वाटावी? ||४५||

मना जे घडी राघवेवीण गेली |
जनीं आपुली ते तुवा हानि केली ||
रघूनायकावीण तो शीण आहे |
जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ||४६||

मना, राघवाविरहित जो क्षण गेला तो आयुष्याचा मोलाचा क्षण फुकट गेला आणि त्यामुळे तू आपल्या जीवनाचा नाश केलास. राघवाविरहित होणारी सारी धडपड म्हणजे व्यर्थ शीणच होय. जो सावधचित्त असतो त्याचे सारे लक्ष सदासर्वदा रामपदी जडलेले असते. ||४६||

मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे |
जनीं जाणता भक्त होऊनि राहे ||
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||४७||

(श्लोक क्र. ४७ ते ५६: भगवंताच्या खऱ्या दासाची लक्षणे)
सद्गुणांवर प्रीती जडवून ते अंगी बाणवून म्हणजे सद्गुणी बनून, सगुणरुपावरील प्रीतीच्या आधाराने निर्गुणाची कास धरण्याचा हा साधनानुक्रम जो राखतो आणि जनात वावरताना जो भक्त सदा जागरूकतेने राहतो त्यालाच निजांतरी श्रीहरीचे दर्शन घडते आणि बाह्य जगातहि त्याच श्रीहरीची लीला प्रतीतीस येते; तो सर्वोत्तम आत्मारामाचा दास जगी धन्य होय. ||४७||

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा |
सदा रामनामे वदे नित्य वाचा ||
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||४८||

ज्याचा देह सदासर्वदा देवकार्याप्रित्यर्थच झिजत असतो, ज्याची वाणी नित्यशः रामगुणगानातच दंग असते आणि परमात्मप्राप्ती  हाच उत्तम स्वधर्म जो सदा पालन करीत असतो तो सर्वोत्तम रामरायाचा दास जगी धन्य होय. ||४८||

सदा बोलण्यासारिखे चालताहे |
अनेकी सदा एक देवासि पाहे ||
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||४९||

जसे बोलतो तसाच तो वागत असतो, विविधतेमध्येहि जो एकाच आत्मदेवाला पाहतो आणि भ्रमाचा संपूर्ण निरास करून जो सगुणोपासना करीत असतो तोच सर्वोत्तम श्रीरामाचा दास जगी धन्य होय. ||४९||

नसे अंतरी काम नानाविकारी |
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ||
निवाला मनीं लेश नाही तमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५०||

ज्याच्या अंतःकरणात कामाचा लेशहि नाही व कामामुळे उत्पन्न होणारे इतर क्रोधादी विकारहि नाहीत, जो अनासक्त राहून ब्रह्मचर्याने तपाचरण करीत असतो, ज्याच्या ठायी अज्ञानरूपी तमाचा लेशहि नाही व त्यामुळेच ज्याला मनःशांती लाभली आहे, तो सर्वोत्तम श्रीरामाचा दास जगी धन्य होय. ||५०||

मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी |
प्रपंचीक नाही जयाते उपाधी ||
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५१||

मदमत्सरासह स्वार्थबुद्धीहि ज्याची सुटली आहे, ज्याच्या प्रापंचिक उपाधींचा पूर्ण निरास झाला आहे आणि ज्याच्या पावन वाणीतून सदा नम्रतायुक्त बोलणे घडते आहे , तोच सर्वोत्तम श्रीरामाचा दास जगी धन्य होय. ||५१||

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे |
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ||
करी सूखसंवाद जो ऊगमाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५२||

आपला सारा वेळ जो तत्वचिंतन व निदिध्यासनात घालवितो; दांभिकपणा धरून जो कधी वितंडवादात पडत नाही आणि सृष्टीचा उगम ज्या मूळ हरीसंकल्पातून होत असतो त्या श्रीहरीच्या कथाकथनाचाच सुसंवाद जो करीत असतो तोच सर्वोत्तम श्रीरामाचा दास जगी धन्य होय. ||५२||

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी |
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ||
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५३||

स्वभावाने सरळ आणि सर्व लोकप्रिय सदासर्वकाळ विवेकयुक्त सत्य भाषण करणारा आणि वाणीने, मनाने किंवा विचारानेहि जो कधी असत्य बोलत नाही तोच सर्वोत्तम श्रीरामाचा दास जगी धन्य होय. ||५३||

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी |
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ||
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५४||

तारुण्यातहि निर्जनवासाची आवड असलेला, कल्पनेच्या जाळ्यात कधीहि न फसणारा, तसेच एकदा विचारपूर्वक केलेल्या दृढ निश्चयापासून कदापि न चळणारा सर्वोत्तम श्रीरामाचा दासच जगी धन्य होय. ||५४||

नसे मानसी नष्ट आशा दुराशा |
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ||
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५५||

ज्याच्या मनात इह पारलौकिक नाशिवंत वस्तूंची दुराभिलाषा नसते, हृदयांतरी भगवत्प्रीतीच्या तहानेनेच जो व्याकूळ झालेला असतो आणि आपल्या निष्कपट भावाने जो देवालाहि ऋणी करून ठेवतो तो सर्वोत्तम श्रीरामाचा दास जगी धन्य होय. ||५५||

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू |
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ||
तया अंतरी क्रोध संताप कैचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५६||

दीनांचा कैवारी, अंतःकरणाचा कनवाळू, स्नेहल स्वभावाचा, कृपाशील आणि निराश्रितांचा (शरणागतांचा) पोशिंदा असा जो असतो त्याच्या अंतःकरणात क्रोधाला व संतापाला कुठून वाव मिळणार? तो सर्वोत्तम श्रीरामाचा दास जगी धन्य होय. ||५६||
(टीप: वरील ४७ ते ५६ श्लोकांत श्रीसमर्थांचे स्वभाव वर्णन, 'आधी केले मग सांगितले' या न्यायाने आलेले आहे.)

जगी होइजे धन्य या रामनामे |
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ||
उदासीनता तत्त्वता सार आहे |
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ||५७||

शास्त्रविहित सत्कर्म, नवविधा भगवद् भक्ती, नित्यनियमित ध्यानादी भगवद्उपासना आणि श्रीरामनामजपाने जगात धन्यता संपादन करावी. तात्विक सारभूत उदासीनता अंगी बाणल्याने  सर्वदा मोकळी वृत्ती राहते. (एकमेव भगवंतच सत्य व सारभूत वस्तू होय आणि तदितर सारे काही मिथ्या असार होय अशा तात्विक विचाराने बुद्धीचा ठाम निश्चय झाल्यामुळे सर्व ऐहिक पदार्थांविषयी स्वाभाविक जी वैराग्यवृत्ती उदित होते ती उदासीनता. बाह्य विषयासक्ततेमुळे होणारी चित्ताची बद्धावस्था या उदासीनतेने नष्ट होऊन जी निर्लेप अवस्था निर्माण होते ती मोकळी वृत्ती.) ||५७||

नको वासना वीषयी वृत्तिरूपे |
पदार्थी जडे कामना पूर्वपापे ||
सदा राम निष्काम चिंतीत जावा |
मना कल्पनालेश तोहि नसावा ||५८||

विषयवासना सूक्ष्मवृत्ती रूपानेहि, स्फुर्तीरुपाने सुद्धा, राहू देऊ नये; कारण ती पूर्व दुःसंस्कार (पाप) जन्य स्फुर्तीच हळू हळू स्थूल कामनेचे रूप घेऊन पदार्थांच्या ठिकाणी जडते आणि पुढील दुःसंस्काराला, पापाला कारण होत असते. पहिल्या स्फुर्तीरुपातच तिला निपटून टाकल्यावर पूर्णतया निष्काम झालेल्या चित्ताने श्रीरामाचे चिंतन करीत जावे आणि चित्तात पुनश्च कल्पनातरंग लेशमात्रहि उठू देऊ नये. ||५८||

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी |
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ||
मनी कामना राम नही जयाला |
अती आदरे प्रीति नाहि तयाला ||५९||

कारण मना, एकदा का कल्पनेच्या तरंगांना अवसर मिळाला की ते कल्पकोटी म्हणजे अगणित प्रकारचे असे उठत राहतात आणि त्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या चित्तात रामनाम स्थिरावत नाही. रामचिंतन घडत नाही, मग रामदर्शनाची तर गोष्टच नको! अरे, ज्याच्या मनातहि रामदर्शनाची आस नाही त्याला श्रीरामचरणी सदर श्रद्धा व प्रीतीहि जडत नाही. ||५९||

मना राम कल्पतरू कामधेनू |
निधी सार चिंतामणी काय वानू ||
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता |
तया साम्यता कायसी कोण आता ||६०||

अरे मना, कल्पवृक्ष, कामधेनु व चिंतामणी यांच्या ठायी वसत असलेल्या मनःकामनापूर्तीच्या शक्तीची सारभूत ठेवच असा जो श्रीराम त्याच्या थोरवीचे वर्णन तरी किती व कसे करावे बरे! निरनिराळ्या वस्तूंच्या ठायी दिसून येणाऱ्या भिन्न भिन्न प्रकारच्या शक्तींचे अस्तित्वच मुळी ज्याच्यावर अवलंबून आहे त्या श्रीरामाची बरोबरी आणखी कोणत्या वस्तूशी करावी बरे? ||६०||

उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे |
तया अंतरी सर्वदा तेचि आहे ||
जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा |
पुढे मागुता शोक जीवी धरावा ||६१||

असा जो महान कल्पवृक्षांचा कल्पवृक्ष श्रीराम त्याच्या छायेत उभा असूनहि माणूस जर दुःख करीत बसेल तर त्या हतभाग्याच्या अंतरी सर्वकाळ ते दुःखच भरून राहील. जनात- लौकिकात व सज्जनांच्या समोरहि हा दुःख वाद वाढवीत गेल्यास जीवनात पुढे मागे, सर्व बाजूने, शोक करीत बसावे लागेल. ||६१||

निजध्यास तो सर्व तूटोनी गेला |
बळे अंतरी शोक संताप ठेला ||
सुखानंद आनंद भेदे बुडाला |
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ||६२||

(कसे ते पहा -) निदिध्यासाची जी थोडी-बहुत सवय जडू लागली होती तीहि या वितंड वादामुळे तुटून गेली, नाहीशी झाली आणि त्या जागी अंतःकरणात दुःख - शोक व चिडचिडेपणा आपले ठाण मांडून बसला. मी - तू रुपी भेदभावामुळे एकात्मतेच्या सुखास्वादाचा आनंद मावळू लागून, शोकसंतापजन्य दुष्चिततेमुळे मनातील निश्चय पूर्णपणे ढळू लागला. ||६२||

घरी कामधेनू पुढे ताक मागे |
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ||
करी सार चिंतामणी काचखंडे |
तया मागता देत आहे उदंडे ||६३||

(मनीचा निश्चय ढळल्याने काय होते पहा) घरी म्हणजेच स्वतःच्या अंतर्यामी श्रीरामरूपी कामधेनु असूनहि तिच्याकडून अमृतस्वरूप प्रेम दुग्ध न मागता दुश्चित माणूस विषयसुखाचे आंबूस ताक मागू लागतो. जी आत्माबोधाभिमुखी अवस्था निदिध्यासाने बनत होती ती सोडून, प्रत्यक्ष निजकरी म्हणजे निजांतरी सर्व चिंतामणीचे सार असा आत्माराम असताना त्याच्या पाशी तर्क-कुतर्क रुपी बाह्याकर्षक कांचेचे तुकडेच मागत बसल्यास तेच भरपूर वाढीस लागतील. (तर्ककुतर्काच्या सवयीने तर्क-कुतर्कच वाढू लागतील). ||६३||

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना |
अती काम त्या राम चित्ती वसेना ||
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा |
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ||६४||

(या अविवेकाचे फळ असे) असा जो मूढ, अविचारी झाला त्याच्या ठिकाणी विवेकविचाराची दृढबुद्धि असत नाही, परिणामतः अविवेकाने कामुकतादी विषयासक्ती वाढून त्याचे चित्त श्रीरामचरणी स्थिरावणार नाही. आसक्तीमुळे लोभ अनावर होऊन चित्ताची प्रक्षुब्धता मात्र बळावेल, हे समजून राहा. विषयासक्तीमुळेच माणूस नेहमी दीनवाणा होत असतो. ||६४||
 
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे |
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ||
धरी रे मना आदरे प्रीति रामी |
नको वासना हेमधामी विरामी ||६५||

(म्हणून हे मना सावध हो आणि) भक्तीशून्य असे दैन्यवाणे जीवन जगू नकोस. अतिमूर्ख माणसाचे दुःख दुणावतच जाते हे जाणून मना, राम चरणापासून दुरावणाऱ्या (विरामी) कामिनी-कांचनादि कडे ओढ घेणाऱ्या वासनेला आवरून अत्यादरपूर्वक श्रीराम चरणी प्रीती जडव. ||६५||

नव्हे सार संसार हा घोर आहे |
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ||
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे |
करी रे मना ध्यान या राघवाचे ||६६||

सज्जना मना, नीट विचारपूर्वक सत्याचा शोध घेशील तर तुझे तुलाच कळून येईल की, हा संसार निःसार आहे, पोकळ आहे. त्यालाच सारभूत समजून त्याच्या मागे लागल्यास त्याचे अति घोर, दुःखदायक परिणाम आहेत. विष घेतले तर सुख होईल का? आपल्याच हातांनी मृत्यू मात्र ओढवून घेशील. तेव्हा या दीनदयाळ राघवाचे, आत्मारामाचे चिंतन-ध्यान कर. ||६६||

घनश्याम हा राम लावण्यरूपी |
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ||
करी संकटी सेवकांचा कुडावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||६७||

(या चिंतन ध्यानाची पद्धत व परिणाम पुढील १० श्लोकात सांगितला आहे.)
तो घननीळ श्रीराम अत्यंत लावण्यसंपन्न आहे. मेरुसारखा पूर्ण धैर्यवान, सागरासारखा गंभीर विवेक विचारशील आणि पूर्ण प्रतापी आहे. संकटकाळी शरणागताचा रक्षणकर्ता आहे. अशा त्या श्रीराम प्रभूचे नित्यशः सुप्रभाती चिंतन करीत जावे. ||६७||

बळे आगळा राम कोदंडधारी |
महाकाळ विक्राळ तोही थरारी ||
पुढे मानवा किंकरा कोण केवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||६८||

कोदंड धनुर्धारी, श्रीराम इतका विलक्षण श्रेष्ठ बलशाली आहे की, त्याच्यापुढे भयंकर असा महाकाळहि चळाचळा कापत असतो; तर मग बिचाऱ्या माणसाचा तो काय पाड लागणार? म्हणून हे मना नित्यशः सुप्रभाती या श्रीरामाचे चिंतन करीत जावे. ||६८||

सुखानंदकारी निवारी भयाते |
जनीं भक्तिभावे भजावे तयाते ||
विवेके त्यजावा अनाचार हेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||६९||

ऐहिक, पारलौकिक सर्व प्रकारचे भय निवारण करून जो शाश्वत आनंद पर्यवसायी सुख देतो त्या श्रीरामरायाला लोकांनी भक्तिभावपूर्वक, शरणागतीपूर्वक, नित्य भजावे हेच श्रेयस्कर होय. विवेकाच्या बळाने दुराचारप्रवृत्ती आणि हेवा-दावा सोडून नित्यशः सुप्रभाती श्रीरामाचे चिंतन करीत जावे. ||६९||

सदा रामनामे वदा पूर्णकामे |
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ||
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७०||

सदा सर्वदा नित्यनेमाने सकळ कामना पूर्ण करणारे असे हे श्रीराम नामस्मरण करीत राहिल्यास साधकाला आपदा, संकटे व त्रास देऊ शकत नाहीत. म्हणून 'मला कोण विचारू शकणार' अशी मदमत्तता व आळसाचा त्याग करून नित्यशः सुप्रभाती श्रीरामाचे चिंतन करीत जावे. ||७०||

जयाचेनि नामे महादोष जाती |
जयाचेनि नामे गती पाविजेती ||
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७१||

ज्याच्या नामोच्चाराने जन्म जन्मांतरीचे महाभयंकर दोष दूर होऊन साधकाला सद्गती लाभते आणि ज्याच्या नाम स्मरणाने सहजगत्याच पुण्यसंचय होत जातो, त्या श्रीरामाचे चिंतन नित्यशः सुप्रभाती करीत जावे. ||७१||

न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ काही |
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ||
महाघोर संसारशत्रू जिणावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७२||

मुखाने नामोच्चारण करण्याला कसलेहि कष्ट पडत नाहीत आणि गाठचे धनहि वेचावे लागत नाही. अत्यंत भयानक अशा संसाररूपी शत्रूला जिंकण्यासाठी, नित्यशः न चुकता, न विसरता, सुप्रभाती श्रीरामाचे चिंतन करीत जावे. ||७२||

देहेदंडणेचे महादुःख आहे |
महादुःख ते नाम घेता न राहे ||
सदाशीव चिंतीतसे देवदेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७३||

देहाला पीडा देऊन माणूस जी साधने करतो ती अति कष्टकर असतात; पण या नाम साधनात तसल्या दारूण दुःखाची नावनिशाणीहि नसते. महातपस्वी भगवान शंकरहि ह्या देवाधीदेवाचे नित्य चिंतन करतात त्या प्रभु रामरायाचे चिंतन नित्यशः सुप्रभाती करीत जावे. ||७३||

बहुतांपरी संकटे साधनांची |
व्रते दान उद्यापने ती धनाची ||
दिनाचा दयाळू मनी आठवावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७४||

पुष्कळशी साधने अशी आहेत की, ती करू गेल्यास नाना संकटे व तऱ्हेतऱ्हेची विघ्नेहि येत असतात. व्रते करणे व त्यांची उद्यापने, सांगता करणे यासाठी धनदानाची आवश्यकता असते. पण हे नाम साधन सर्वांना सुलभ आहे. श्रीराम दीनांवर दया करणारा असल्यामुळे, हे मना, त्याला मनात आठवून, नित्यशः सुप्रभाती त्याचे चिंतन करीत जावे. ||७४||

समस्तांमधे सार साचार आहे |
कळेना तरी सर्व शोधून पाहे ||
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७५||

(यज्ञयागादी कर्मकांडामध्ये त्रुटी झाल्यास प्रायश्चित्त म्हणून व न्यून ते पूर्ण करण्यासाठी हरीनाम स्मरणाचा विधी सांगितला असल्याने) सर्वहि साधनांत भगवन्नाम साधन हेच सारभूत, श्रेष्ठ व खरोखरीचे सत्य साधन होय. हे पटत नसेल तर एकदा सर्व, वेदशास्त्र पुराणे, संतवचने, इत्यादी, शोधून खात्री करून घे, आणि जीवांतील याबद्दलचा व्यर्थ संशय, शंकाकुशंका, फेडून टाक. मग निःशंक मनाने नित्यशः सुप्रभाती श्रीरामाचे चिंतन करीत जा. ||७५||

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही |
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ||
म्हणे दास विश्वास नामी धरावा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७६||

माणसाच्या हातून धड कर्म घडत नाही, धर्माचे यथासांग पालन होत नाही किंवा योगसाधनहि पूर्णपणे जमत नाही. विषयभोगहि मनमुराद घेता येत नाही व त्याचा त्यागहि पूर्णपणे करता येत नाही. पूर्णपणे यथासांग असे काहीच घडत नाही. हे मना, तू नीट समजून घे. म्हणून समर्थ श्रीरामदास आवर्जून सांगतात की भगवन्नामात दृढ विश्वास ठेवून नित्यशः सुप्रभाती, न चुकता, श्रीरामाचे चिंतन करीत जावे. ||७६||

करी काम निष्काम या राघवाचे |
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ||
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता |
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ||७७||

या राघवाचीच कामना करीत राहिल्याने ती जीवाला शेवटी निष्काम करते; आणि याच्या सगुण रूपाचे ध्यान जीवाला आपल्या सत्यस्वरुपी तद्रूप करते. या प्रमाणे श्रीरामरायाचे गुणगान साधकाच्या सर्व द्वंद्वांचा, द्वैतभावनेचा, छेद करून, त्याला निर्द्वंद्व, ब्रह्मस्वरूपच करते. हे मना, हरीकीर्तनीच तुझ्या वृत्तींचा दृढ विश्वास, ध्यास, जडला असतानाच मात्र हे सर्व होणे शक्य आहे (हे नीट लक्षात घे).  ||७७||

अहो ज्या नरा रामविश्वास नाही |
तया पामरा बाधिजे सर्व काही ||
महारज तो स्वामि कैवल्यदाता |
वृथा वाहणे देहसंसारचिंता ||७८||

(मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे -) ज्याला श्रीरामाच्या ठायी दृढ श्रद्धाविश्वास नाही तो माणूस पामर, मूर्खच समजावा आणि त्याने काहीहि केले तरी ते सर्व त्याला बाधकच (अहंकारामुळे) ठरते. साऱ्या विश्वाचा स्वामी तो मोक्षदाता श्रीरामराय, अंतर्यामी, विराजमान असतांना देहाची व संसाराची चिंता आपण वाहणे व्यर्थच होय. (कर्ता श्रीरामच असल्याने त्याला सर्वहि चिंता आहे म्हणून). ||७८||

मना पावना भावना राघवाची |
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ||
भवाची जिवा मानवा भूलि ठेली |
नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ||७९||

मानवी जीवाला भवाची भुलावण, होणाराची चिंता भ्रमवीत असल्यामुळे सद्वस्तुची धारणा होत नाही; असद्वस्तुचीच मात्र होते परंतु ती व्यर्थ जाते. म्हणून हे मना, होणाराची चिंता सोडून दे आणि परमपावन अशी श्रीरामभावना, आपण तद्रूपच असल्याची अनुभूती दृढपणे हृदयांतरी धारण कर. ||७९||

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते |
तरा दुस्तरा त्या परा सागराते ||
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते |
करा नीकरा त्या खरा मत्सराते ||८०||

कितीहि भरा, पुन्हा रिकामेच अशा या दुर्भर पोटाची चिंता पार विसरून जा दुसऱ्यांची ओझी वाहणाऱ्या खरा-गाढवाप्रमाणे, नेहमी इतरांच्या भल्याबुऱ्याचा भार मनात वाहून जीवाला जाळीत राहणाऱ्या मत्सराचा पूर्ण निपटारा, नाश कर आणि भगवान शंकराचाहि हृदय निवासी जो मायापती श्रीराम त्याला हृदयी दृढ धारण करून दुस्तर असा भवसागर अगदी सहज, लीलया तरून जा. ||८०||

मना मत्सरे नाम सांडू नको हो |
अती आदरे हा निजध्यास राहो ||
समस्तांमधे नाम हे सार आहे |
दुजी तूळणा तूळिताही न साहे ||८१||

बा मना, इतरांचा मत्सर करण्यात व्यग्र होऊन, नामस्मरण सोडून देऊ नको बरे! अत्यादरपूर्वक ह्या नामस्मरणाचा निदिध्यास लागून राहू दे. इतर सर्वहि साधनांमध्ये नामस्मरण हे सारभूत होय; दुसऱ्या कोणत्याहि साधनाची याच्याशी बरोबरी होत नाही. हे अतुलनीय साधन होय. (हे पूर्वी श्लो. ७४, ७५, ७६ मध्ये स्पष्ट केलेच आहे). ||८१||

बहू नाम या रामनामी तुळेना |
अभाग्या नरा पामरा हे कळेना ||
विषा औषधा घेतले पार्वतीशे |
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||८२||

नामे उदंड आहेत. पण रामनामाची सर त्यांना येऊ शकत नाही. बिचाऱ्या अभागी मानवाला हे कळतच नाही. अरे, साक्षात पार्वतीनाथ शंकरांनी जिथे हलाहल विषावरील उतारा म्हणून रामनाम हेच औषध घेतले तिथे विषयांचा दास झालेल्या बापड्या जीवाची ती काय कथा! ||८२||

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो |
उमेसी अती आदरे गूण गातो ||
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे |
परी अंतरी नामविश्वास तेथे ||८३||

कामदेवाला जाळून ज्याने भस्म केला तो मदनारी शंकर, देवी उमेसमवेत श्रीरामध्यानी तल्लीन होऊन अत्यादराने, प्रेमपूर्वक, श्रीराम गुणगान करीत असतो. ज्याच्या ठायी पराकाष्ठेचे ज्ञान, धगधगीत वैराग्य आणि सृष्टी संहाराचे अचाट सामर्थ्य आहे अशा भगवान शंकरांच्या हृदयांतरीहि रामनामावर अढळ विश्वास आहे. ||८३||

विठोने शिरी वाहिला देवराणा |
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ||
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी |
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ||८४||

तो परमात्मस्वरूप रामरायच आपल्या विठ्ठलरुपाने देवाधिदेव शंकराला मस्तकी धारण करतो आणि त्या शंकराच्या हृदयांतरी तर श्रीरामाचाच निदिध्यास लागलेला असतो! अशी ही हरिहरांची अन्योन्य प्रीती! परंतु त्या सर्वात्मस्वरूप श्रीरामाविषयी तुमचे मात्र गाढ अज्ञान! ज्याच्या नामस्मरणाने महातपस्वी सदाशिवाची विषबाधा शमली तो दयाधन प्रभू श्रीराम मरणसमयी  सर्व जीवांना काळपाशापासून निश्चितच मुक्त करील हा दृढ विश्वास असू द्या. ||८४||

भजा राम विश्राम योगेश्वरांचा |
जपू नेमिला नेम गौरीहराचा ||
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी |
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ||८५||

मोठमोठ्या योगीराजांचाहि जो निजस्वरूप विसावा त्या श्रीरामप्रभूला नित्य भजत जा. उमामहेश्वरांनी  ज्याच्या नामस्मरणाचा नित्य नियम केला आणि महातपस्वी चंद्रशेखराने निजांतरीचा दाह शामविला तो श्रीराम तुम्हालाहि अंतकाळी जन्ममरणाच्या पाशांतून कायमचा मुक्त करील ही खात्री असू द्या. ||८५||

मुखी राम विश्राम तेथेचि आहे |
सदानंद आनंद सेवोनि राहे ||
तयावीण तो शीण संदेहकारी |
निजधाम हे नाम शोकापहारी ||८६||

वाचेने श्रीराम नामोच्चारण हाच जीवींचा खरा विसावा होय. हे जाणून नित्यशः नामोच्चारण करीत राहावे आणि निजानंद, स्वरुपतेचा दिव्य आनंद, उपभोगीत असावे. त्याशिवाय इतर वायफळ बडबड म्हणजे जीवाला व्यर्थ संशयात ठेवून शिणवणे होय. जीवाचे नित्य निवास स्वरूप असे हे श्रीरामनामच खरे दुःख शोक निवारक आहे. ||८६||

मुखी राम त्या काम बाधू शकेना |
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ||
हरीभक्त तो शक्त कामास भारी |
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ||८७||

ज्यांच्या मुखी राम ठामपणे बसलेला आहे त्याला कामबाधा होऊच शकत नाही. श्रीराम गुणगानाच्या योगाने जे धैर्य निपजते ते इष्ट म्हणजे योग्य वेळी अचूकपणे आपोआप प्रगट होते; कधीहि धोका देत नाही. बलवान अशा कामालाहि हरिभक्त मारून पिटाळून लावतो. याचे प्रत्यंतर ब्रह्मचारी मारुतीमध्ये दिसून येते. श्रीराम चरणांच्या आश्रयाने मारुतीरायाला केव्हढी धन्यता लाभली! अहो तो अजरामर झाला! ||८७||

बहू चांगले नाम या राघवाचे |
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ||
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे |
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ||८८||

किती चांगले आहे बरे या राघवाचे नाम! गुणांनी मोठे सुंदर, अक्षराने लहानसे, उच्चाराने सोपे आणि काहीहि वेचावे न लागता सुखात बसणारे! आणि प्रभावी तरी किती! या दुस्तर संसाराचे मूळ जे अज्ञान त्याचे निर्मूलन करून साधकाला आत्मज्ञान संपन्न करते. मानवी जीवांना खऱ्या अर्थाने हे रामनामच मोक्षपददायी होते. ||८८||

जनीं भोजनीं नाम वाचे वदावे |
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ||
हरीचिंतने अन्न सेवीत जावे |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||८९||

भोजनाचे वेळी आमजनतेने, लहान मोठा हा भाव न ठेवता, वाचेने नामोच्चारण करावे. अत्यादराने मोठ्याने नामघोषहि करावा. हरिस्मरण पूर्वक, हरिर्दाता हरिर्भोक्ता या भावनेने, एकेक घास ग्रहण करावा, अशारितीने नामोच्चारण हे श्वासोच्छवासाप्रमाणे जीवनसाथी बनले म्हणजे स्वाभाविकच श्रीहरीची प्राप्ती होऊन जीवन कृतार्थ होते. ||८९||

न ये राम वाणी तया थोर हाणी |
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम काणी ||
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी |
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ||९०||

पण ज्याच्या मुखातून रामनाम निघत नाही तो हळू हळू मायाजालात फसत जाऊन, स्वतःचा मोठा घात करून घेतो. ज्याला हरिनामाचे वावडे त्यांचे जिणेच व्यर्थ होय, त्याचेच नांव अभागी. वेदशास्त्रांनीहि हरिनामाची महती गायिली आहे, पुराणांतरी वेदव्यासांनी आग्रहाने हरिनामाची थोरवी कथन केलेली आहे. ||९०||

नको वीट मानू रघूनायकाचा |
अती आदरे बोलिजे राम वाचा ||
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा |
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ||९१||

म्हणून बा मना, त्या रघूनायकाचा कधीहि वीट येऊ देऊ नकोस. वाचेने आदरपूर्वक राम नामोच्चारण करीत राहा. त्यामध्ये तुझे काहीच खर्च होत नाही. तेव्हा मुखाने जानकीनाथाचा जयघोष करीत राहिल्याने सहजपणे तो जगज्जीवन राम तुझ्या अंतर्यामी प्रगट होईल. ||९१||

अती आदरे सर्वही नामघोषे |
गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ||
हरी तिष्ठतू तोषला नामघोषे |
विशेषे हरामानसी रामपीसे ||९२||

अति आदरपूर्वक होणाऱ्या नामघोषाने जन्मजन्मांतरीचे सर्वहि दोष दूर पळून, गिरीकंदरी जाऊन, काळे करतील, नष्ट होतील. नामघोषाने श्रीहरी प्रसन्न होऊन भक्ताच्या कल्याणार्थ सदा त्याच्या पाठीशी उभा ठाकतो. श्रीशंकरांच्या चित्ताला तर श्रीराम नामाचे जणू वेडच लागून राहिलेले आहे (त्यांना इतर कशाचेहि स्मरणच होत नाही). ||९२||

जगी पाहता देव हा अन्नदाता |
तया लागली तत्त्वता सार चिंता ||
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे |
मना सांग पा रे तुझे काय वेचे ||९३||

हे मना, या जगरहाटीचे सखोल निरीक्षण करून पाहशील तर तुझ्या लक्षात येईल की, सर्व प्राणीमात्रांचा खरा अन्नदाता, पोषणकर्ता तो भगवंतच एक आहे. त्यालाच सर्वांची खरी काळजी आहे. त्या रामरायाचे नुसते नाम सुद्धा मुखाने उच्चारावयाला तुला कष्ट का पडतात? त्यात तुझे खर्च ते काय होते बरे? ||९३||

तिन्ही लोक जाळू शके कोप येता |
निवाला हरू तो मुखे नाम घेता ||
जपे आदरे पार्वती विश्वमाता |
म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ||९४||

कोपविष्ट झाल्यास अखिल त्रिभुवनाचा संहार करू शकणारा श्रीशंकरहि राम नामस्मरणानेच प्रकृतिस्थ होऊन शांत राहतो. विश्वजननी देवी पार्वतीहि अति आदराने रामनाम जपत असते. म्हणून तुम्हीहि  आता तरी निश्चयपूर्वक ते रामनाम न चुकता घेत जा. ||९४||

अजामेळ पापी वदे पुत्रकामे |
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ||
शुकाकारणे कुंटणी राम वाणी |
मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ||९५||

पापी असूनहि अजामेळाने अंतःकाळी केवळ पुत्रप्रेमाने का होईना 'नारायण, नारायण' असा ध्यास घेतला आणि तो मुक्त झाला. पोपटाला शिकविण्याच्या निमित्ताने 'राम, राम' असे सतत उच्चारणारी गणिकाहि उद्धरून गेल्याने, पुराणांतरी प्रसिद्धीस आली. असा आहे हा नामाचा अगाध महिमा! ||९५||

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी |
जपे रामनामावळी नित्यकाळी ||
पिता पापरूपी तया देखवेना |
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ||९६||

दैत्यकुळात जन्म पावलेला प्रल्हाद सदासर्वकाळ नारायणाचे नामस्मरण करून महाभगवत्भक्त होऊन गेला. पापाचीच जणू ओतीव मूर्ती असा जो त्याचा पिता हिरण्यकश्यपू त्याला हे सहन होईना. त्याच्या मुखी ते नाम येऊ शकले नाही म्हणून तो होता तसाच दैत्य राहिला. ||९६||

मुखी नाम नाही तया मुक्ति कैची |
अहंतागुणे यातना ते फुकाची ||
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा |
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ||९७||

ज्याच्या मुखी नाम वसत नाही त्याला मुक्ती लाभावीच कशी बरे? अहंतेमुळे त्या बिचाऱ्याला, जन्ममरणाच्या फेऱ्यांत  भ्रमात राहून, यातनाच भोगाव्या लागतात. नामविरहित, आयुष्य घालविणाऱ्याचा अखेरीस, वासनेमुळे, दैन्यवाणा अंत होतो, म्हणून वेळीच सावध व्हा, आणि त्या देवरायाचे नाम या क्षणापासून घेऊ लागा. ||९७||

हरीनाम नेमस्त पाषाण तारी |
बहू तारिले मानवी देहधारी ||
तया रामनामी सदा जो विकल्पी |
वदेना कदा जीव तो पापरूपी ||९८||

रामनामाने अंकित झालेले जड असे पाषाण सुद्धा, सेतुबंधनाच्या वेळी तरले. त्याचप्रमाणे अहल्येसारख्या अगणित मानवी देहधारी जीवांनाहि रामनामाने तारिले आहे. ही वस्तुस्थिती असूनहि, रामानामाविषयी साशंक राहून, जो मुखाने कदापि नामोच्चारण करीत नाही तो पापाचाच केवळ पुतळा होय. ||९८||

जगी धन्य वाराणसी पुण्यराशी |
तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ||
मुखे रामनामावळी नित्यकाळी |
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ||९९||

काशी क्षेत्री मरण येऊन सद्गती लाभावी या इच्छेने बहुजन वृद्धापकाळी तेथे जाऊन राहतात. तसेच पूर्वजांना सद्गती लाभावी म्हणून तेथे जाऊन पिंडदानादी क्रियाहि करतात. अनंत काळापासून काशिक्षेत्राला 'अविमुक्त महान पुण्यक्षेत्र' म्हणून धन्यता लाभली आहे ही धन्यता लाभण्याचे कारण हेच की साक्षात विश्वेश्वर तेथे राहून सर्व काळ रामनामावळी गात असतात. भगवान शंकर आपल्या या उदाहरणाने जगाला हाच एक कल्याणाचा मार्ग सांगत आहेत की ज्या ठिकाणी श्रीराम नामोच्चारण सतत चालत राहील त्या ठिकाणाला काशीक्षेत्राची धन्यता प्राप्त होईल. ||९९||

यथासांग रे कर्म तेही घडेना |
घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ||
दया पाहता सर्व भूती असेना |
फुकाचे मुखी नाम तेही वसेना ||१००||

(अरे मना, बिचाऱ्या अज्ञ जीवांची कशी शोचनीय अवस्था होते ते बघ)
त्यांच्या हातून शास्त्रशुद्ध सांगोपांग कर्म घडावे तर ते होत नाही. त्यामुळे जो काही दानधर्म घडतो तो अचूक पुण्यप्रद होत नाही, निदान दयाबुद्धीने काही पुण्य गाठी पडावे तर ती दयाबुद्धी सर्वभूती निरपेक्ष अशी ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत विनाखर्चाचे सोपे रामनाम घेत राहिल्याने कितीतरी कल्याण साधेल. परंतु तेहि त्यांचे वाचेत बसत नाही. ||१००||
 
जया नावडे नाम त्या येम जाची |
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ||
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे |
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ||१०१||

पहा मना, नीट ध्यानात ठेव की, ज्याला नामाची आवड नाही त्यालाच कृतकर्म भोगण्यासाठी यम यातना सोसाव्या लागतात. ज्याच्या चित्तात नाना विकल्प व तर्ककुतर्कच उठत राहातात, त्यालाच अहंतेमुळे ची ची करीत नरकवासात खिचपत पडावे लागते म्हणून बाबा रे ऐक, अति आदरपूर्वक रामनाम घ्यावे बरे! वाचेने घडणाऱ्या नामोच्चारामुळे सर्व दोष स्वाभाविकच, सहजपणे, नष्ट होतात. ||१०१||
(श्लोक ८१ ते १०१ पर्यंत नाममहात्म्यपूर्वक जे साधन सांगितले त्याचाच सारांशरूपाने श्लो. १०२ मध्ये उपदेश करीत आहेत.)

अती लीनता सर्वभावे स्वभावे |
जना सज्जनालागि संतोषवावे ||
देहे कारणी सर्व लावीत जावे |
सगूणी अती आदरेसी भजावे ||१०२||

सर्वतोभावे अति लीनतेने व सच्छीलतेने वागून इतर जनांना, विशेषतः संतसज्जनांना संतुष्ट करण्याचाच प्रयत्न करावा. तसेच जीवनभर देहाला सत्कारणी झिजवून त्याचे सार्थक करावे आणि आदरयुक्त श्रद्धाभक्तीने सगुणोपासना अखंड चालवावी. ||१०२||

हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी |
देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ||
परद्रव्य आणीक कांता परावी |
यदर्थी मना सांडि जीवी करावी ||१०३||

हे मना, परद्रव्य आणि परस्त्रीकडे चित्त वळू देऊ नये. जिवाभावाने त्याचा त्याग करावा. तसेच देहाच्या ठिकाणी जडलेल्या बुद्धीला तत्वनिरुपणाने देहाची नश्वरता व परमात्मवस्तूची नित्यसत्यता पटवून द्यावी. निरुपणाने मीपणाचा ऱ्हास होत जावा. आणि हरिगुणगानाच्या द्वारा चित्तात श्रीराम स्वरूपी गाढ प्रीती धरावी. ||१०३||

क्रियेवीण नानापरी बोलिजेते |
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ||
मना कल्पना धीट सैराट धावे |
तया मानवा देव कैसेनि पावे ||१०४||

(वर निर्देशिलेला सगुणोपासनेचा उपदेश चित्तात बिम्बून जीवनात उतरला तरच उपयोग) नाहीतर प्रत्यक्ष आचरणाशिवाय नुसते शब्द-पांडित्य निरुपयोगी होय. कारण दुश्चित्त, विषयासक्त झालेले चित्त, शेवटी स्वतःचीच खंत करून कुढू लागते. मन जर कल्पनातरंगाच्या पाठीमागे धावत असेल तर अशा व्यग्र अशांत माणसाला देव पावावा तरी कसा बरे? ||१०४||

विवेके क्रिया आपुली पालटावी |
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ||
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा |
मना कल्पना सोडि संसारतापा ||१०५||

म्हणून मना, विवेकाच्या सहाय्याने स्वतःला आवर आणि आपल्या वागणुकीत पालट घडवून, क्रिया शुद्ध करून, अति आदरपूर्वक सगुणोपासनेचा मार्ग सुधार. लोकात बोलण्यासारखेच सरळपणाने वाग आणि मनःकल्पित संसारतापापासून आपली सोडवणूक करून घे. ||१०५||

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा |
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ||
दया सर्वभूती जया मानवाला |
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ||१०६||

(क्रियाशुद्धी कशी करावी ते श्लो. १०९ पर्यंत सांगितले आहे.)
चंचलपणाने वृत्याकार झालेल्या मनाला विवेकाच्या सहाय्याने आवरून स्थिर करावे - अशाने चित्तशुद्धी होते. अशा एकाकार, स्थिर चित्ताने स्नानसंध्यादि नित्यकर्म करीत जावे. त्याच प्रमाणे ज्या मानवाच्या ठायी सर्वांभूती दयाबुद्धी निपजते तो प्राणिमात्राशी सदा प्रेमळपणाने वागतो आणि त्याचे चित्तहि भक्तिभावपूर्ण होऊन नेहमी स्वस्थ, शांत राहते. ||१०६||

मना कोप आरोपणा ते नसावी |
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ||
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी |
मना होइ रे मोक्षभागी विभागी ||१०७||

मना, क्रोधादि षड्रिपूंना तुझ्यात मूळ धरू देऊ नको आणि बुद्धी ही नेहमी सज्जन संगतीतच ठेव. नेहमी विषयीजनांच्या दुष्टसंगतीचा आवर्जून त्याग कर आणि अशा रीतीने मोक्षरूपी धनाचा भागीदार हो. ||१०७||

मना सर्वदा सज्जनाचेनि योगे |
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ||
क्रियेवीण वाचाळता ते निवारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी ||१०८||

मना, सज्जनसंगतीत नैसर्गिक अनुकरणाने आपलेहि कर्म पालटू, शुद्ध होऊ लागते आणि भक्तिभावप्राप्तीच्या मार्गाला लागते आचरणाशिवायची नुसतीच बडबड थांबते. वादविवादाची प्रवृत्तीहि तुटते आणि शंकानिरसनार्थ कल्याणप्रद प्रश्नोत्तरांचा सुसंवाद होऊ लागतो. ||१०८||

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा |
जनीं सूखसंवाद सूखे करावा ||
जगी तोचि तो शोकसंतापहारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी ||१०९||

जनात वागतांना वादविवाद टाळून प्रेमपूर्वक संभाषण आनंदाने करावे. वादरहित जो कल्याणप्रद सुसंवाद होतो तोच लोकांमधील शोक संताप निवारण करू शकतो. ||१०९||

तुटे वाद संवाद त्याते म्हणावे |
विवेके अहंभाव याते जिणावे ||
अहंतागुणे वाद नाना विकारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी ||११०||

(वाद का वाढतो व सुखसंवाद कसा घडतो? -)
अहंपणामुळे वाद वाढतो आणि वादंग सुरु झाले की नाना विकार बळावतात. म्हणून विवेकाच्या सहाय्याने आधी अहंभावाला जिंकून वादाचे मूळ तोडावे. याला म्हणतात वादप्रवृती नाहीशी करणे. वादाची खुमखुमी गेल्यावर परस्पर कल्याणप्रद संभाषण जे होते त्याला संवाद म्हणतात. ||११०||

हिताकारणे बोलणे सत्य आहे |
हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ||
हिताकारणे बंड पाखांड वारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी ||१११||

कुतर्काधिष्ठित पाषांडमतांचे वाढलेले प्रस्थ निवारण करून, सर्व गोष्टींचा धांडोळा घेऊन,जे मोक्षरूपी हित साधण्याच्याच दृष्टीने संभाषण होते तेच खरे बोलणे होय. या प्रकारचे वादविरहित परस्पर कल्याणकारी जे बोलणे तोच खरा संवाद होय. ||१११||

जनीं सांगता ऐकता जन्म गेला |
परी वादवेवाद तैसाचि ठेला ||
उठे संशयो वाद हा दंभधारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी ||११२||

एक सांगत असतो व दुसरा ऐकत असतो. असा सांगण्या-ऐकण्याचा प्रकार आयुष्यभर चालतो. पण वादविवाद मात्र तसाच राहतो. कारण दांभिक वादात संशयामागून संशय उठत राहतात. निःसंशय करणारा जो कल्याणप्रद संवाद त्यानेच वाद कायमचा नष्ट होतो. ||११२||

जनीं हीत पंडीत सांडीत गेले |
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ||
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे |
मना सर्व जाणीव सांडूनि राहे ||११३||

ज्याच्यापेक्षा अधिक व्युत्पन्न, विद्वान, क्वचितच कोणी असू शकेल असे गाढे पंडितहि लोकांना तर हितोपदेश करीत गेले. परंतु ज्ञातेपणाच्या  अहंतेमुळे, स्वतः त्या उपदेशाचा अंगिकार न केल्याने, ब्रह्मराक्षस होऊन बसले. हे जाणून मना, ज्ञातेपणाची व्यर्थ घमेंड सोडून दे. ||११३||
(पहा: गीता अ. १५ श्लोक १५: खरा वेदवत्ता व ज्ञानी एक प्रभूच होय.)

फुकाचे मुखी बोलता काय वेचे |
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ||
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे |
विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ||११४||

अनुभवशून्य वाक् पांडित्य मिरविताना पदरचे काहीच खर्च होत नसते. परंतु यामुळेच 'मी मोठा ज्ञानी', असा मनात गर्व मात्र वाढत जातो. जे आपण करून पाहिलेले नाही त्याविषयीची बडबड ही केवळ फुकट फुशारकी होय. त्याने श्रोत्यावक्त्याचे समाधान होत नाही. सखोल विचारपूर्वक तुझ्या अनुभवाचे तूच संशोधन करून पहा, म्हणजे या वरील गोष्टीची सत्यता कळून येईल. ||११४||

तुटे वाद संवाद तेथे करावा |
विवेके अहंभाव हा पालटावा ||
जनीं बोलण्यासारखे आचरावे |
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ||११५||

म्हणून हे मना, आधी विवेकाच्या सहाय्याने अहंभाव दूर सारावा आणि अशा रीतीने वादाचे मूळच तुटले की मग निरहंकारवृत्तीने, नम्रतेने, चर्चात्मक संवाद करावा. जगात वागताना बोलण्याप्रमाणे वागावे किंवा जे कृतीत उतरलेले असेल तेच बोलावे. अशा रीतीने विवेकपूर्वक आपल्या आचरणात बदल घडवून, सरळ अशा भक्तिमार्गाचेच अनुसरण करावे. ||११५||

बहू श्रापिता कष्टला अंबऋषी |
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ||
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११६||

(भक्तीमार्गानेच जाण्याचे कारण कशाहि प्रसंगी भक्तवत्सल भगवान भक्तांचे संरक्षणच करतो. यास पौराणिक उदाहरणे श्लो. ११६ ते १२५)
राजा अम्बरीषाला दुर्वास ऋषींच्या शापापासून वाचविण्याकरिता भगवंतांनी स्वतः दहा वेळा गर्भवासाचे कष्ट सोसून त्याला जन्ममरणाच्या शापातून मुक्त केला. तसेच दुधासाठी कष्टी झालेल्या बालक उपमन्यूला संपूर्ण क्षीरसागरच बहाल केला. असा हा भक्तांचा कैवारी देव आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||११६||

धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे |
कृपा भाकिता दीधली भेटि जेणे ||
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११७||

सापत्न मातेच्या अवहेलनेमुळे दीन झालेला पंचवर्षीय असहाय्य बालक ध्रुव अरण्यात निघून जाऊन भगवंताची करुणा भाकीत बसला असता त्याला दर्शन देऊन कृतार्थ तर केलाच. पण त्याहूनही विशेष म्हणजे चिरंजीव करून तारकासमूहात सर्वश्रेष्ठ स्थानी त्याला अढळपद दिले. असा हे प्रेमाची जणु खाणच असलेला भक्तवत्सल भगवान आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||११७||

गजेंद्रू महासंकटी वाट पाहे |
तयाकारणे श्रीहरी धावताहे ||
उडी घातली जाहला जीवदानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११८||

मगरमिठीत अडकून प्राणसंकटात पडलेल्या गजेंद्राची आपल्या मदतीसाठी आर्त हाक ऐकून श्रीहरी तत्क्षणी त्याच्याकडे धावून आले. इतकेच नव्हे तर (त्याच्या रक्षणाची त्यांना इतकी घाई झाली होती की) तत्काळ त्या डोहात उडी घेऊन, त्याला जीवदान देऊन, कृतार्थ केला. असा हा भक्तकैवारी देव आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||११८||

अजामेळ पापी तया अंत आला |
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ||
अनाथासि आधार हा चक्रपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११९||

पापी असूनहि अंतःकाळी पुत्राच्या निमित्ताने केलेल्या नारायण नामोच्चारानेहि कृपावंत होऊन अजामेळाला मोक्षपद दिले असा हा अनाथांचा वाली चक्रपाणी श्रीराम आपल्या भक्तांचा कैवारी असून तो त्यांची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||११९||

विधीकारणे जाहला मत्स्य वेगी |
धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ||
जना रक्षणाकारणे नीच योनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२०||

त्या दयाघनप्रभुने ब्रह्मदेवाकरिता मत्स्यरूप घेऊन वेदांचे रक्षण केले. समुद्रमंथन प्रसंगी कूर्मरूप धरून अति अवजड अशी मंदार पर्वतरूपी मंथा आपल्या पाठीवर धारण केली तसेच जगत-कल्याणार्थ व जनरक्षणार्थ अगदी निकृष्ट अशा वराह योनीत जन्म घेऊन दुष्ट निर्दालानाचे व साधू संरक्षणाचे आपले ब्रीद राखले. असा हा भक्तकैवारी देव आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||१२०||

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला |
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ||
न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२१||

महान भगवद्भक्त प्रल्हादाचा त्याच्याच पित्याकडून होत असलेला अनन्वित छळ न साहून प्रभूने त्या हिरण्यकष्यपूचा वध करण्यासाठी नृसिंहरूप धारण केले. ते रूप इतके विक्राळ होते की त्याच्या संतप्त नेत्रातून प्रदीप्त अग्नीप्रमाणे विषारी ज्वाला निघत होत्या. त्यावेळी त्याच्या समीपहि जाण्याचे धैर्य कोणाला होईना. पण प्रल्हादाने मात्र निर्भयपणे त्याच्याजवळ जाऊन, हात जोडून, करुणा भाकून, त्यास शांत व प्रसन्न केले. असा हा निजभक्ताचा कैवारी आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||१२१||

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी |
तया कारणे वामनू चक्रपाणी ||
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२२||

देवराज इंद्राने करुणा भाकल्यामुळे, प्रभुने, वामनरूप धारण करून बळीला पाताळात दडपून इंद्राला संकटमुक्त केले. विप्ररक्षणार्थ धनुर्धारी परशुराम रूपाने अवतार घेऊन सहस्त्रार्जुनाचा वध करून क्षत्रियांचा मद उतरविला. असा हा भक्त कैवारी देव आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||१२२||

अहल्येसतीलागी आरण्यपंथे |
कुडावा पुढे देव बंदी तयाते ||
बळे सोडिता घाव घाली निशाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२३||

अरण्यातून जाता जाता देवी अहल्येचा कैवार घेऊन उद्धार केला आणि मग पुढे रावणाच्या बंदीत पडलेल्या देवांना, रावणाचे निशाण तोडून (म्हणजे त्याचा वध करून) स्वपराक्रमाने ज्याने सोडविले तो भक्तवत्सल श्रीराम आपल्या दासाची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||१२३||

तये द्रौपदीकारणे लागवेगे |
त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ||
कळीलागि जाला असे बौद्ध मौनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२४||

वस्त्रहरण प्रसंगी द्रौपदीचा आर्त धांवा ऐकून, हातातील सारी कामे टाकून, तातडीने धावून येऊन प्रभू श्रीकृष्णांनी (वस्त्रावतार धरून) तिची लाज राखली. तसेच कलियुगात बुद्ध रूपाने अवतार घेऊन मौन धारण केले. असा हा भक्तकैवारी देव आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||१२४||

अनाथां दिनांकारणे जन्मताहे |
कलंकी पुढे देव होणार आहे ||
तया वर्णिता शीणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२५||

दीन व अनाथ झालेल्या जनतेच्या रक्षणार्थ, पूर्वी अनेक वेळा प्रभूने अवतार घेतला आहे. पुढेहि तो दयाघन कलंकी रूपाने अवतार घेणार आहे. ज्या अवाक्-मनसगोचर परमात्म्याचे वर्णन करता करता वेदवाणीहि थकून, नेति नेति म्हणत स्तब्ध झाली, तो भक्तकैवारी देव आपल्या भक्ताची उपेक्षा कधीहि करीत नाही. ||१२५||

जनांकारणे देव लीलावतारी |
बहुतांपरी आदरे वेषधारी ||
तया नेणती ते जन पापरूपी |
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ||१२६||

दीनजन संरक्षणाप्रीत्यर्थ आपल्या अद्भुत लीलेने तो परमादयाघन प्रभु अवतार धारण करीत असतो. भक्तांचा धावा ऐकून त्यांच्या रक्षणाकरिता प्रेमाने नाना तऱ्हेचे वेषहि धारण करीत असतो (मत्स्य, कूर्मादि देह व वस्त्रावतार,  इत्यादि) त्या नित्यसत्यस्वरूप भगवंताला जे समजून घेत नाहीत, ओळखत नाहीत, तेच खरोखर पापाचे पुतळे, दुरात्मे, महामूर्ख किंबहुना चान्डाळच होत. (साधकाने म्हणूनच त्यापासून दूर असावे.) ||१२६||

जगी धन्य तो राममूखे निवाला |
कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ||
देहेभावना रामबोधे उडाली |
मनोवासना रामरूपी बुडाली ||१२७||

ज्याच्या सर्व मानसिक वासना, इंद्रियाद्वारा बाह्य विषयांकडे न धावता हृदयनिवासी जो श्रीराम त्याच्याठायीच विरून गेल्या आहेत, ज्याची देहाविषयींची जाणीव आत्मारामाचे ज्ञान झाल्यामुळे नष्ट झाली आहे आणि जो रामकथा श्रवणात पूर्ण तल्लीन झाल्यामुळे राममयच अशा स्वरूपसुखस्वानुभवाने शांत, समाधानी झाला आहे, तोच या जगात खरोखर धन्य होय (अशांचीच संगत साधकाने करावी.) ||१२७||

मना वासना वासुदेवी वसो दे |
मना वासना कामसंगी नसो दे ||
मना कल्पना वाउगी ते न कीजे |
मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ||१२८||

सज्जना मना, आता तू संत सज्जनांच्या संगतीत रहा. संत सज्जनांचा जीवनादर्श समोर ठेवून तद्वत जीवन जगण्याचा प्रयत्न कर. शक्तिक्षय करणाऱ्या फोल कल्पनातरंगात रमू नकोस. संगतीची चटक लावणाऱ्या विषयांची कामना इच्छा करू नकोस. आणि अशातऱ्हेने साधू संतांच्यासारखी तुझी वासना त्या सर्वव्यापी वासुदेव परमात्मस्वरूपी लीन होऊ दे. (वासना एक देशीय संकुचित न राहता सर्वव्यापी होत गेली तर ती हळू हळू निर्मूळ होत जाते.) ||१२८||

गतीकारणे संगती सज्जनाची |
मती पालटे सूमती दुर्जनाची ||
रतीनायिकेचा पती नष्ट आहे |
म्हणोनी मनातीत होवोनी राहे ||१२९||

सद्गतीप्रीत्यर्थ, आपल्याला नीट वळण लागावे म्हणून सज्जनांची संगती आवश्यक असते. सत्संगतीच्या प्रभावाने दुर्जनांची दुष्टबुद्धीहि पालटून तीच संमती होते हे पुराणेतिहासावरून प्रसिद्धच आहे. पण मना, एका गोष्टीत सावध रहा. ती गोष्ट ही. रति म्हणजे विषय सुखातील गोडी, तिचा नायक जो काम तो मोठा नष्ट आहे. तो मनसिज म्हणजे मनातच जन्माला येतो व मनावर त्याचा मोठा प्रभाव असतो. विषयसुखाची गोडी चाखवून तो मनाला वश करतो. याच्यापासून सावध राहून मनबुद्धीच्या पलीकडे असलेला जो श्रीराम त्याच्याठायी तल्लीन होऊन मनातीत होण्याचा प्रयत्न कर. ||१२९||

मना अल्प संकल्प तोही नसावा |
सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ||
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा |
रमाकांत एकांतकाळी भजावा ||१३०||

मना, लौकिक वस्तु नाशिवंत असल्याने अल्पकाळ टिकतात. त्यांच्या प्राप्तीसाठी जो संकल्प तो अल्पसंकल्प. तो चित्तात वागवू नये. सच्चिदानंदस्वरूप शाश्वत असल्याने नित्य सत्य होय. त्याचा प्राप्तीचा संकल्प तो सत्यसंकल्प. हाच तुझ्या चित्तात जिवाभावाने ठसावा. जगात वागताना वायफळ बडबड आणि तर्कवितर्क करीत बसू नये. आणि एकांतकाळी म्हणजे मिळेल त्या निवान्तवेळी रमाकांत श्रीरामाचे भजन, मनन करीत राहावे. ||१३०||

भजावा जनीं पाहता राम एकू |
करी बाण एकू मुखी शब्द एकू ||
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू |
धरा जानकीनायकाचा विवेकू ||१३१||

नीट विचार करून पाहशील तर श्रीराम हेच एक उपासनेकरिता आदर्श दैवत होय हे सहज कळून येईल. उत्तम जीवनघडणीच्या दृष्टीने श्रीरामरायाच्या ठायी असलेल्या महान सद्गुणांचा अंगिकार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ पहा - अचूक लक्ष्यवेधसामर्थ्य  म्हणून एकबाणी. वाचनाचा पक्केपणा प्राणांतीहि न ढळणारा म्हणून एकवचनी. दैनंदिन जीवनयापनहि  इतके शुद्ध व प्रभावी की त्यामुळे अयोध्येतील सर्वहि जीव, अनायासे, उद्धरून गेले. (तसेच, जानकीनाथाची विवेकशक्ती इतकी बिनतोड व जाज्वल्य होती की, तिच्यापुढे असत्याचरण, अधार्मिक प्रवृत्ती, अनीतिमानता, दुबळी मनोवृत्ती कधीहि टिकू शकत नसत.) म्हणून जानकीनायकाचाच विवेक चित्तात दृढपणे धारण करावा. ||१३१||

विचारूनि बोले विवंचूनि चाले |
तयाचेनि संतप्त तेही निवाले ||
बरे शोधल्यावीण बोलो नको हो |
जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ||१३२||

विवेकी माणसांचे बोलणे व वागणे यथायोग्य विचारपूर्वकच होत असल्याने त्यामुळे दुःख-संतप्त जीवांनाहि सांत्वना मिळू शकते. म्हणून मना, मागचा पुढचा शोध घेतल्याशिवाय, खऱ्या खोट्याचा विवेक केल्याशिवाय, बोलत जाऊ नकोस आणि वागणुकीतहि नेमस्तपणा धरून, बोलल्याप्रमाणे आचरण करून, श्रीरामाप्रमाणे आपलेहि जीवन शुद्ध सात्विक करून घे. ||१३२||

हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी |
जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ||
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे |
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ||१३३||

ज्या हरिभक्ताने आपल्या मनात सद्वस्तुला एकदा निश्चयपूर्वक स्थान दिले तोच यथार्थाने विरक्त होतो आणि प्रत्यययुक्त ज्ञानाचा तो ठेवाच होऊन राहतो. त्याच्या नुसत्या दर्शनाने किंवा चरणस्पर्शानेहि  अपरंपार पुण्याची जोड होते आणि त्याच्या मुखातून निघालेल्या एखाद्या उपदेशपर शब्दाने तर संदेहाची समूळ निवृत्तिच होते. ||१३३||

नसे गर्व आंगी सदा वीतरागी |
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ||
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा |
इही लक्षणी जाणिजे योगिराणा ||१३४||

त्याचप्रमाणे हरिभक्ताच्या चित्तात गर्वाला वाव नसतो. तो सदाचा अनासक्त असतो. तो क्षमा व शांती या परमैश्वर्याचा उपभोग घेणारा असल्याने दयाशील व सदा दक्ष असा योगी असतो. त्याच्या चित्तात लोभाचाच अभाव असल्याने प्रक्षुब्धता किंवा दीनवाणेपणा राहूच शकत नाही. वरील (दोन्ही श्लोकांतील) लक्षणांनी जो युक्त असतो त्यालाच खरा योगीराज म्हणून ओळखावे. ||१३४||

धरी रे मना संगती सज्जनाची |
जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ||
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे |
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ||१३५||

अशा सज्जनाच्या संगतीच्या प्रभावाने दुर्जनाची दुष्प्रवृत्ती पालटून, सद्भाव, सदबुद्धि आणि सन्मार्ग त्याच्या अंगी जडतो. सत्संगतीचा महिमा इतका अगाध आहे की, महाभयंकर असा कालपाशहि तीमुळे तुटून जातो. म्हणून अरे मना, अशा सज्जनाची संगती तू आवर्जून धर. ||१३५||

भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे |
भयातीत ते संत आनंत पाहे ||
जया पाहता द्वैत काही दिसेना |
भयो मानसी सर्वथाही असेना ||१३६||

(या श्लोकापासून सगुणातून निर्गुण ब्रह्मस्वरूपाकडे जाण्यासाठी साधकाची मनोभूमिका स्वरुपाभिमुख करीत आहेत.)
हे सारे ब्रह्मांड विनाशाच्या भयाने व्यापलेले आहे. कारण ते द्वैतयुक्त आहे. जेथे द्वितीयत्वाची भावना असते तेथे भय हे असतेच. एकमेव सच्चिदानंद वस्तुच काय ती भयातीत आहे. कारण ती अनंत असल्याने तेथे दुजेपणाला वावच नाही. सच्चिदानंदाच्या अपरोक्षानुभूतीने द्वैताचा संपूर्ण निरास होतो म्हणून असा ब्रह्मवेत्ता सत्पुरुषच सर्वथैव निर्भय मनाने सर्वत्र विचरण करीत असतो. ||१३६||

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले |
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ||
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना |
जुने ठेवणे मीपणे आकळेना ||१३७||

थोर महापुरुष अनंत काळापासून परब्रह्म प्राप्तीचा मार्ग स्पष्टपणे दाखवीत आले असूनहि अज्ञानी जीव होते तसेच अज्ञानात गुरफटलेले आहेत. याचे मुख्य कारण देहबुद्धि! या  कर्तृत्वाहन्कारामुळे जीवाचे मिथ्याचार काही केल्या टळत नाहीत आणि या 'मी' पणामुळेच सनातन असे हे आत्माज्ञानरुपी जुने ठेवणे, शाश्वत धन, नीट कळून येत नाही. ||१३७||

भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले |
जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आले ||
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना |
जुने ठेवणे मीपणे आकळेना ||१३८||

भ्रमात सापडल्यामुळे आत्मज्ञानरुपी निजधन हाती लागत नाही. ते गुप्त झाल्यासारखे झाले आहे. त्यामुळे जीवाचे अज्ञानरुपी जन्मदारिद्र्य कायमचे कपाळी ठाण मांडून बसल्यासारखे झाले आहे. ज्याला 'देहच मी' हा प्रमादयुक्त निश्चय टाळता येत नाही त्याला मीपणहि चुकत नाही आणि त्यामुळे सनातन असे हे अत्माज्ञानरुपी शाश्वत धन उमगून येत नाही. ||१३८||

पुढे पाहता सर्वही कोंदलेसे |
अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ||
अभावे कदा पुण्य गाठी पडेना |
जुने ठेवणे मीपणे आकळेना ||१३९||

वास्तविक सखोल दृष्टीने पाहिले तर ते आत्मस्वरूप सर्वत्र ओतप्रोत, घनदाट भरून असल्याचे कळून येईल. समोर दिसणारे दृश्य, मूर्तिमान स्वरूप, वास्तविकपणे ब्रह्ममय असूनहि पाषाणमय जडरूप आहेसे ज्याला वाटते त्या अभाग्यास भक्तिभावहीनतेमुळे कदापि पुण्य-संचय होऊ शकणार नाही आणि त्यामुळे सनातन असे हे आत्मज्ञानरूपी निजधन ओळखताहि येणार नाही. ||१३९||

जयाचे तया चूकले प्राप्त नाही |
गुणे गोविले जाहले दुःख देही ||
गुणावेगळी वृत्ति तेही वळेना |
जुने ठेवणे मीपणे आकळेना ||१४०||

स्वतःला त्रिगुणांच्या पसाऱ्यात गोवून घेतल्याने जीवाला त्रिविध तापाचे दारुण दुःख भोगावे लागते आणि त्यामुळे त्याचेच सत्यस्वरूप असलेले हे परब्रह्म त्याच्यापासून जणू दुरावते. त्याला प्राप्त होऊ शकत नाही. गुणांपासून अलिप्त होता न आल्याने त्याची वृत्तीच गुणातीत अशा ब्रह्मस्वरूपाकडे वळत नाही आणि मीपणा चुकत नाही. त्यामुळे आत्मज्ञानरुपी शाश्वत निजधनाचे आकलनहि होत नाही. ||१४०||

म्हणे दास सायास त्याचे करावे |
जनीं जाणता पाय त्याचे धरावे ||
गुरू अंजनेवीण ते आकळेना |
जुने ठेवणे मीपणे आकळेना ||१४१||

म्हणून (समर्थ राम) दास असा उपाय सुचवितात की, जगात जो जाणता, अपरोक्ष साक्षात्कारी असेल त्याला शरण जाऊन त्याचे पाय धरावे, त्याची मनोभावे सेवा शुश्रूषा करावी. सद्गुरुकृपेच्या ज्ञानांजनाशिवाय मलीन झालेली दृष्टी शुद्ध होणार नाही. अशुद्ध दृष्टीचा मीपणा चुकणार नाही आणि तिला कधीही आत्मज्ञानरूपी शाश्वत धन कळून येणार नाही. ||१४१||

कळेना कळेना कळेना ढळेना |
ढळे नाढळे संशयोही ढळेना ||
गळेना गळेना अहंता गळेना |
बळे आकळेना मिळेना मिळेना ||१४२||

(सद्गुरूकृपेचे महत्व आणखी स्पष्ट करतात) लक्षात ठेव, त्रिवार सांगतो की, सद्गुरुकृपेशिवाय आत्मज्ञानरुपी जुने ठेवणे कळून येणार नाही आणि अज्ञानहि ढळणार नाही. निःशेष निवृत्त होणार नाही. श्रद्धा विश्वास मात्र ढळेल आणि त्यामुळे सद्गुरू आढळून येणार नाहीत. सद्गुरुप्राप्ती न झाल्याने सर्व संशय निःशेष फिटणार नाहीत आणि अहंताहि कधीच गळून पडणार नाही. दुराग्रहाच्या बळावर स्वतःच पाहण्याचा कितीहि प्रयत्न केला तरी ते सत्स्वरूप कळून येणार नाही आणि अपरोक्षानुभवाची प्राप्ती तर अशक्यच होईल. ||१४२||

अविद्यागुणे मानवा ऊमजेना |
भ्रमे चूकले हीत ते आकळेना ||
परीक्षेविणे बांधले दृढ नाणे |
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ||१४३||

पण काय करावे? अविद्याग्रस्त झाल्याने मानवाला समजत असूनहि उमजत नाही. मीपणाच्या भ्रमामुळे आपण स्वहिताला चुकत आहोत हेहि कळून येत नाही. नीट परीक्षा न करताच अहं-ममरुपी खोटे नाणे हा भ्रमिष्ट मानव पदरी घट्ट बांधून बसला आहे. ते नाणे खरे, हितकर, की  खोटे, अनहितकर हे सद्गुरुकृपेशिवाय कोणाला जाणता येऊ शकेल बरे? ||१४३||

जगी पाहता साच ते काय आहे |
अती आदरे सत्य शोधून पाहे ||
पुढे पाहता पाहता देव जोडे |
भ्रम भ्रांति अज्ञान हे सर्व मोडे ||१४४||

हे जे नामरूपात्मक जग समोर दिसते आहे ते खरोखरच सत्य आहे का हे निरखून पारखून पाहण्याचा योग्य प्रयत्न करशील आणि अत्यादरपूर्वक सत्याचा शोध घेशील तर जसजसा शोध सूक्ष्म होत जाईल तसतशी त्या सत्यस्वरूप परमात्म्याची जोड होत जाईल. आणि ज्या भ्रमामुळे 'मीच कर्ता' ही भ्रांती उद्भवली आणि हे सर्वहि दृश्य सत्यच आहे असे अज्ञान वाढले तो भ्रम सपरिवार विरून जाईल. ||१४४||

सदा वीषयो चिंतिता जीव जाला |
अहंभाव अज्ञान जन्मास आला ||
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे |
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावे ||१४५||

(सत्यासत्य कसे पारखावे त्याचे वर्म श्लो. १५० पर्यंत समजावून दिले आहे).
अल्प, क्षणभंगुर अशा विषयांचेच चिंतन सतत भ्रमामुळे घडत गेल्याने, मूळच्या व्यापक आत्मास्वरुपालाच, संगदोषाने, लघुत्व म्हणजेच जीवत्व आल्यासारखे भासते, त्या भासमान जीवत्वाविषयी अहंभाव जडून अज्ञानाचा उदय होतो. विवेकाच्या प्रकाशाने पाहिले तर हे सर्व भ्रान्तिजाल विरून जाऊन सत्स्वरुपाच्या ठायी वृत्ति जडू लागेल. जीवत्वाचे उगमस्थान जे भ्रमप्रमादशिलत्व ते असे विवेकाने दूर झाले की जीवाचा कधी जन्मच झालेला नव्हता हे सत्य स्वाभाविकपणे सहजच प्रत्ययास येईल. ||१४५||

दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी |
अकस्मात आकारले काळ मोडी ||
पुढे सर्व जाईल काही न राहे |
मना संत आनंत शोधूनि पाहे ||१४६||

हे जे विविध प्रकारचे विलोभनीय नामरूपात्मक जग दृष्टीला दिसते, मनाला भासते, ते कोट्यावधी कल्पपर्यंत म्हणजेच शाश्वत टिकणारे नव्हे. आकस्मिक जे आकारास येते ते कालांतराने नष्ट होत असते आणि अखेरीस महाप्रलयाच्या वेळी तर कालासाहित हे सर्वहि काहीच उरत नाही. म्हणून हे वास्तविक सत्य नव्हे. ज्याला कालमर्यादा म्हणजे अंत नाही असे जे अनंत शाश्वत सत्स्वरूप आहे तेच एकमेव सत्य होय. म्हणून मना, त्याचा शोध घेऊन त्याची प्रतीति घे. ||१४६||

फुटेना तुटेना चळेना ढळेना |
सदा संचले मीपणे ते कळेना ||
तया एकरूपासि दूजे न साहे |
मना संत आनंत शोधूनि पाहे ||१४७||

जे नित्य शाश्वत आहे ते कधी भंग पावत नाही, त्याचे तुकडे होत नाहीत, त्यात चलनादि विकारहि होत नाहीत, तर ते नेहमी जसेच्या तसे अढळ, अव्यय असते; पण मीपणामुळे  ही प्रतीति येत नाही. एकमेवाद्वितीयाला दुजेपणा सहनच होत नसतो. म्हणून मना, 'मी कोणी तरी वेगळा आहे' असा दुजेपणा टाकून जे शाश्वत व अनंत आहे त्या नित्यसत्याचा शोध घेऊन, प्रतीति घे. ||१४७||

निराकार आधार ब्रह्मादिकांचा |
जया सांगता शीणली वेदवाचा ||
विवेके तदाकार होऊनि राहे |
मना संत आनंत शोधूनि पाहे ||१४८||

ब्रह्मादिक सगुणदेवत्रयाला ज्या निर्गुण निराकार सत्स्वरुपाचा आधार आहे, त्याचे वर्णन करता करता वेदवाणीहि थकली. विवेकाच्या योगाने निरहंकार वृत्ती बनवून त्या सत्स्वरुपाशी तदाकार होऊन राहा आणि त्याकरिता मना, त्या नित्यसत्यस्वरूप अनंताचा सांगोपांग शोध घेऊन एकदा तरी प्रतीति घे. ||१४८||

जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे |
जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे ||
जनीं पाहता पाहणे जात आहे |
मना संत आनंत शोधूनि पाहे ||१४९||

या चक्षुरिन्द्रियाने दृश्य जगात त्याचा शोध घेण्याचा कितीहि यत्न केलास, तरी ते स्वरूप दृश्य नसल्याने, कधीच लक्षित होऊ शकणार नाही. ज्ञान दृष्टीने पाहशील तर मात्र ते स्वरूप तुझ्यापासून गुप्त राहू शकणार नाही. त्याला यथार्थाने पाहू जाता पाहण्याची क्रियाच संपते. कारण पाहणाराच मुळात ते स्वरूपच आहे, असे केवळ ऐक्य होत असल्याने मना, त्या नित्यसत्यस्वरूप अनंताचा नीट शोध घेऊन एकदा तरी प्रतीति घे. ||१४९||

नसे पीत ना श्वेत ना श्याम काही |
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही ||
म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे |
मना संत आनंत शोधूनि पाहे ||१५०||

बाबा रे, ते काळे, निळे, पिवळे, पांढरे किवा कोणत्याहि रंगाचे नाही ते निरंग आहे. ते व्यक्त तर नाहीच; पण स्वानुभवगम्य असल्याने त्याला अव्यक्तहि म्हणवत नाही. (काही दिसणे व न दिसणे हे वृत्तीचेच तरंग असल्याने तू या पाखंडाच्या नादी लागू नकोस असे अत्यंत कळकळीने येथे श्रीसमर्थांनी बजावले आहे.) ते आहे मात्र निश्चित आणि तेच आपले खरे स्वरूप होय असा ज्याला विश्वास बनतो त्यालाच मुक्ति लाभते असे (समर्थ राम) दास आवर्जून सांगत आहेत. तेव्हा बा मना, एकदा तरी त्या नित्यसत्यस्वरूप अनंताचा, तुझा मानलेला वेगळेपणा सोडून, शोध घे आणि पहा काय होते! तू तदाकारच होशील ||१५०||

खरे शोधिता शोधिता शोधिताहे |
मना बोधिता बोधिता बोधिताहे ||
परी सर्वही सज्जनाचेनि योगे |
बरा निश्चयो पाविजे सानुरागे ||१५१||

चिकाटीने, न कंटाळता, शोध घेत राहिल्याने शेवटी सत्याचा शोध हा लागतोच तसेच स्वभावतःच प्रमादशील असलेल्या मनालाहि सतत शिकवीत राहिल्याने विवेक उमगू लागतो; परंतु हे सारे संतसज्जनांच्या उपदेशानुसारच करता येत असते म्हणून सद्गुरुचरणी अत्यादरपूर्वक शरण जाऊन त्यांच्या कृपेने सत्स्वरुपाचा उत्तम निश्चय बाणवून घे. ||१५१||

बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा |
परी अंतरी पाहिजे तो निवाडा ||
मना सार साचार ते वेगळे रे |
समस्तांमधे एक ते आगळे रे ||१५२||

सूक्ष्म तत्वाचे बुद्धिगम्य कुशल विवरण पुष्कळांना करता येते; पण हृदयांतरी स्वस्वरूपाचा निश्चयात्मक प्रकाश फाकला पाहिजे (तरच त्याचा उपयोग!) कारण समस्त वस्तूंमध्ये एकत्वाने अनुस्यूत असूनहि सर्वातीत असे ते सारभूत सत्तत्त्व साऱ्या नामरूपात्मक विश्वांतील वस्तूंहून अगदीच आगळे, विलक्षण असे आहे रे. ||१५२||

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने |
समाधान काही नव्हे तानमाने ||
नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागे |
समाधान ते सज्जनाचेनि योगे ||१५३||

केवळ पिंड-ब्रह्मांडातील पदार्थज्ञानाने, तत्वविवरणाच्या कौशल्याने किवा उदात्त-अनुदात्त प्लुतादि स्वरयुक्त वेदगानाने खरे समाधान लाभणार नाही. नुसत्या योगक्रियेने, यज्ञयागादि कर्मकान्डाने  किंवा हेकाडपिश्या वैराग्याने भोगत्याग करूनहि खरे समाधान लाभत नसून केवळ सत् जनांच्या, स्वानुभवी संतांच्या कृपाप्रसादानेच ते लाभत असते. ||१५३||

महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे |
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ||
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो |
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ||१५४||

द्वितीयेची चंद्रकोर ज्याने पाहिली आहे त्याने एखाद्या वृक्ष शाखादी ढोबळ चिन्हाच्या सहाय्याने ती चंद्रकोर दाखवून दिल्यावर ज्याप्रमाणे त्या चिन्हावर लक्ष केंद्रित न करता, चंद्रकोरीकडे दृष्टि वळवावयाची असते, त्याप्रमाणे संतसज्जनांच्या संगतीत महावाक्ये, तत्व-विवरण किंवा पंचीकरणादि संकेतांचे अनुभवात्मक विवरण समजून घेऊन, त्या सांकेतिक विवरणातच अडकून न पडता, सत्स्वरुपाच्या मनन-चिंतन-निदिध्यासनाकडे मन वळवून, त्याचा साक्षात्कार करून घ्यावयाचा असतो. ||१५४||

दिसेना जनीं तेची शोधूनि पाहे |
बरे पाहता गूज तेथेचि आहे ||
करीं घेउं जाता कदा आढळेना |
जनीं सर्व कोंदाटले ते कळेना ||१५५||

या दृश्य सृष्टीत जे सहज उघड दिसून येत नाही त्याचा शोध सूक्ष्म विचार करून घ्यावा. शुद्ध विचाराच्या सहाय्याने नीटपणे पाहिलेस की तुला वस्तूचे गूढ रहस्य तेथेच दडलेले आढळेल आणि हळू हळू उलगडेलहि. मात्र ते हातात प्रत्यक्ष घेता येणार नाही. कारण ते इंद्रियांना कदापि गोचर होत नसते. म्हणूनच वस्तुमात्रात ते ओतप्रोत भरलेले असूनही सहजासहजी कळून येत नाही. ||१५५||

म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे |
अतर्कासि तर्की असा कोण आहे ||
जनीं मीपणे पाहता पाहवेना |
तया लक्षिता वेगळे राहवेना ||१५६||

ज्ञातेपणाच्या अभिमानाने 'मला ते कळले आहे' असे जो म्हणतो तो मूर्ख समजावा. तर्कातीत अशा त्या सत्स्वरुपाचा तार्किक बुद्धीने उहापोह करणारा कोणी तरी असू शकेल का? द्रष्टा मी अशा वेगळेपणाने पाहू गेल्यास ते स्वरूप गवसणार नाही, कारण एकदा का त्याची अनुभूती आली की आपले वेगळे असे अस्तित्वच उरू शकत नाही. सर्व मीपणाच लोपून जाऊन उरते ते केवळ एकमेवाद्वितीय परमात्मस्वरूपच. जाणता म्हणून, तर्किता म्हणून किवा द्रष्टा म्हणून कोणी वेगळा उरू शकतच नाही. ||१५६||

बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे |
जया निश्चयो येक तोही न साहे ||
मती भांडती शास्त्रबोधे विरोधे |
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ||१५७||

एका (महावाक्याच्या) निश्चयावर ज्याची बुद्धी अढळपणे स्थिरावत नाही तोच विविध शास्त्रग्रंथ धुंडाळीत बसतो व त्याचा बहुविध विस्तार पाहून भांबावून जातो. मतिमान लोकांकडे पाहावे तर शास्त्राचे परस्परविरुद्ध अर्थ लावून ते आपसातच भांडत बसलेले दिसतात. मात्र यथार्थ ज्ञानबोधाने ज्याची बुद्धी प्रबोधित झाली आहे त्याची, मन मानेल ती अर्थ लावण्याची, प्रवृत्तीच खुंटते (आणि तोच अढळपणे एका परमात्मनिश्चयावर स्थिरावतो) ||१५७||

श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे |
स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे ||
स्वये शेष मौनावला स्थीर राहे |
मना सर्व जाणीव सांडून पाहे ||१५८||

उपनिषदे, न्यायदर्शन, मीमांसादर्शन, तर्कशास्त्र, स्मृतिग्रंथ, स्वयंवेद आणि आश्चर्यकारक अशी वेदांत वाक्ये इत्यादिकांतून परमात्म स्वरूपाचे वर्णन आढळते. पण तेहि अपुरेच आहे असे जाणून सहस्त्रमुखाचा शेषहि शेवटी मौन धरून स्वस्थ बसला. तेथे (मानवी) मना तुझी काय कथा! म्हणून तूहि, जाणतेपणाचा अभिमान सोडून, स्वस्थपणे स्वस्वरूपाची अनुभूती घेत राहा. ||१५८||

जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची |
तया भोजनाची रुची प्राप्त कैची ||
अहंभाव ज्या मानसीचा विरेना |
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ||१५९||

जाणतेपणाच्या अभिमानाची माशी ज्याने गिळली आहे त्याला ज्ञानरूपी भोजनाची चव कशी घेता यावी? ज्याच्या मनातील अहंभाव विरून जात नाही त्याला ज्ञानरूपी अन्न पचावे तरी कसे? (ते वांती होऊन, आपला ज्ञातेपणा मिरविण्याच्या रूपाने, बाहेरच पडणार!) ||१५९||

नको रे मना वाद हा खेदकारी |
नको रे मना भेद नना विकारी ||
नको रे मना शीकवू पूढिलांसी |
अहंभाव जो राहिला तूजपासी ||१६०||

अरे मना, (अपयशाच्या) खेदाला कारण होणारा वादविवाद करीत बसू नकोस. त्यामुळेच नाना (मतभेदजन्य) तट पडतात आणि (असूयादि) विकार बळावतात. तसेच मना, तुझ्याजवळ जो अहंभाव ठाण मांडून बसला आहे, त्याच्या आहारी जाऊन, लोकांना सांगण्या-शिकविण्याच्याहि भरीस पडू नकोस. ||१६०||

अहंतागुणे सर्वही दुःख होते |
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ||
सुखी राहता सर्वही सूख आहे |
अहंता तुझी तुंची शोधून पाहे ||१६१||

अहंतेमुळेच हे सारे जन्ममरणादि दुःख भोगावे लागते. गंगौघाप्रमाणे मुखाने अविरत ज्ञान बोलले तरी ते अंतःकरणात स्थिरावलेले नसल्याने, सारे अहंतेमुळे फोल ठरते, ही तुझी अहंता तुलाच हुडकून काढायला हवी व तिचा त्याग करून निजसुखाने राहायला हवे; म्हणजे सारे काही सुखमयच होऊन जाईल. ||१६१||

अहंतागुणे नीति सांडी विवेकी |
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ||
परी अंतरी सर्वही साक्ष येते |
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ||१६२||

विवेकी पुरुषहि या अहंतेमुळे नीतिभ्रष्ट होतो. अनीतीच्या बळावर, वरपांगी डामडौलाने, सर्व लोकांत जरी बोलबाला होत असला तरी ज्याला त्याला मनोमन खऱ्या गोष्टीची साक्ष पटलेली असतेच. पण अहंभाववश झालेली बुद्धी या अन्तःसाक्षीकडे तर दुर्लक्ष करतेच शिवाय इतर शास्त्रप्रमाणांनाहि जुमानत नाही आणि अखेरीस मूळची विवेकबुद्धीहि निघून जाते. ||१६२||

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला |
देहातीत ते हीत सांडीत गेला ||
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६३||

'मीच मोठा' असा दृढनिश्चय करून बसल्याने देहातीत असे जे सत्स्वरूप त्याचा विसर पडून, खऱ्या आत्मकल्याणाला असा माणूस अंतरला. हे जाणून मना, नेहमी सज्जनाची संगति धर आणि तिच्या सहाय्याने या देह तादात्म्याला शुद्ध आत्मैक्य भावनेत परिणत कर. ||१६३||

मने कल्पिला वीषयो सोडवावा |
मने देव निर्गूण तो ओळखावा ||
मने कल्पिता कल्पना ते सरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६४||

(देहबुद्धीला आत्मबुद्धीत कसे परिणत करावे हे पुढे १७३ श्लोकापर्यंत सांगतात.)
मनाने कल्पिलेला विषय मनानेच विचारपूर्वक बाजूला सारावा आणि अशा निर्विषय झालेल्या शुद्ध मनाने आत्मदेवाचे निर्गुण स्वरूप ओळखून घ्यावे. एकदा का आत्मदेवाच्या सत्यस्वरुपाची ओळख पटली की मन तिथेच जडवून, त्या निर्गुणाच्या कल्पनेच्या बळाने, बाह्य विषयकल्पनांचा निरास करावा. हा अभ्यास सहज दृढ होण्यासाठी सदासर्वकाळ सज्जनांचीच संगती धरावी. ||१६४||

देहादीक प्रपंच हा चिंतियेला |
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ||
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६५||

देहादि प्रपंच हा मायिक असून मिथ्या होय असे बौद्धिक चिंतन कितीहि केले, तरी अंतरात त्याच्याविषयींचा लोभ, ममत्व, नष्ट न होता, निश्चितपणे ठाण मांडून बसलेले असतेच. याला मरण मीपणा. या मीपणातून सोडविणारी सुखदायी अशी मुक्ति हरिचिंतनाने मिळवावी व हे नीट समजण्यासाठी सदासर्वदा सज्जन संगतीतच असावे. ||१६५||

अहंकार विस्तारला या देहाचा |
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा ||
बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६६||

'मीपणाचा' या देहाचा अहंकारच 'माझेपणाने' जास्त व्यापक झाला आहे. त्यामुळे स्त्री पुत्र मित्रादिक 'माझी' आहेत असे समजून त्यांच्याविषयी जी आसक्ति, ममता निर्माण होते तीच पुढील जन्माला कारणीभूत होते. ही जन्मभर चिंता करावयास लावणारी भ्रांत अवस्था हरिचिंतनाच्या बळाने नष्ट करावी आणि त्यासाठी सतत सज्जनसंगतीतच असावे. ||१६६||

बरा निश्चयो शाश्वताचा करावा |
म्हणे दास संदेह तो वीसरावा ||
घडीने घडी सार्थकाची धरावी |
सदा संगती सज्जनाची धरावी ||१६७||

श्रीसमर्थ रामदास म्हणतात की, आता 'मी-माझे' हा संदेह, भ्रम पूर्णपणे विसरून, आपल्या शाश्वत सत्स्वरुपाचा मोक्षदायी अढळ निश्चय करावा आणि निदिध्यासनात अखंड राहून जीवनाचा क्षण न् क्षण धन्यतेचा करावा. आणि हे सहज जमण्यासाठी आवर्जून सज्जनाचीच संगति धरावी. ||१६७||

करी वृत्ती जो संत तो संत जाणा |
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ||
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते |
परी सज्जना केवि बाधू शके ते ||१६८||

ज्याने चित्तवृत्ती स्व-स्थ केली आहे, सत्स्वरुपी लीन केली आहे, तोच खरा संत असे समजावे. त्याला दुष्ट आशेचे वारे कधी झपाटीत नसल्याने तो कधीच दीनवाणा दिसत नाही. दुराशेच्या उपाधीमुळे देहबुद्धी वाढत असते असे जाणून असणाऱ्या दक्ष सज्जनाला ती कधी तरी बाधू शकेल काय? ||१६८||

नसे अंत आनंत संता पुसावा |
अहंकारविस्तार हा नीरसावा ||
गुणेवीण निर्गूण तो आठवावा |
देहेबुद्धिचा आठवू नाठवावा ||१६९||

अशा संत सज्जनाला, आद्यंतरहित अशा परामात्मतत्वाचे स्वरूप सादर विचारून (परिप्रश्नेन सेवया) जाणून घ्यावे आणि मग त्या स्वरूपज्ञानाच्या बळाने आद्यंतवंत असा हा जो देहाहन्कार व त्याचा स्त्रीपुत्रादि ममत्वविस्तार यांचा समूळ निरास करावा. देहबुद्धीची पुसटशी आठवणहि येऊ न देता, गुणरहित म्हणजेच गुणातीत अशा निर्गुण सत्स्वरुपाचेच नित्य स्मरण चिंतन करीत राहावे. ||१६९||

देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी |
विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी ||
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे |
म्हणोनि सदा तेचि शोधीत जावे ||१७०||

ज्ञानमय प्रबोधाने या अज्ञान-भ्रांतिमय देहबुद्धीचा त्याग करावा. विवेकाने देहाचे नाशिवंत रूप आणि आत्मवस्तुचे नित्यस्वरूप चित्तावर सतत बिम्बवीत राहून, आत्मचिन्तनाच्या द्वारा तदाकार व्हावे. वृत्तीचा स्वभाव तदाकार होण्याचा नसून बाह्यगामी आहे हे ओळखून सतत कटाक्षाने सत्स्वरुपाचा हा विवेकयुक्त शोध करीत राहिले पाहिजे. ||१७०||

असे सार साचार ते चोरलेसे |
इही लोचनी पाहता दृश्य भासे ||
निराभास निर्गूण ते आकळेना |
अहंतागुणे कल्पिताही कळेना ||१७१||

ते सारभूत सत्तत्व, अदृश्य असल्याने, लपल्यासारखे आहे. त्यामुळे या डोळ्यांना तेच ते नामरूपात्मक दृश्य जगात सत्यत्वाने भासमान होत आहे. पण निराभास असे जे निर्गुण सत्स्वरूप त्यांचे मात्र आकलन होऊ शकत नाही. लेशमात्र अहंता असेपर्यंत कितीहि कल्पना केली तरी ते सत्स्वरूप कळू शकणार नाही हे पक्के ध्यानात ठेवावे. ||१७१||

स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या |
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ||
मुळी कल्पना दो रुपे तेचि जाली |
विवेके तरी स्वस्वरूपी मिळली ||१७२||

सर्वप्रथम जी हरीसंकल्परूप कल्पना स्फुरली तीच माया होय. ही दोन प्रकारची असते सुविद्या व अविद्या. 'एकोSहं' अशी ब्रह्मत्वाची कल्पना ते सुविद्या माया होय. 'बहु स्याम्' अशी विविद्य विषयाकार कल्पना ती अविद्या माया होय. विवेकपूर्वक निरास करीत गेल्यास ही मूळमायाहि सत्स्वरुपात विलीन होते आणि संकल्पातीत असे केवळ एकमेवाद्वितीय सत्स्वरुपच उरते. ||१७२||

स्वरूपी उदेला अहंकार राहो |
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ||
दिशा पाहता ते निशा वाढताहे |
विवेके विचारे विवंचूनि पाहे ||१७३||

ग्रहणसमयी राहूमुळे निरभ्र आकाशहि जसे काळोख्याने आच्छादिले जाते तद्वत या अहंकाररुपी राहूच्या उदयामुळे सत्स्वरूपरुपी परमाकाश जणू झाकले जाऊन, पाहावे त्या दिशेला सर्वत्र अज्ञानरुपी रात्रीचा काळोखच वाढत असलेला दिसतो. म्हणून आत्मानात्मविवेक व सारासारविचार (दासबोध द. १३ स. १ व २) यांच्या सहाय्याने नीट सूक्ष्मावलोकन करून पहा. (म्हणजे या काल्पनिक राहूचा निरास होऊन केवल सत्स्वरुपाचा प्रकाश फाकेल.) ||१७३||

जया चक्षुने लक्षिता लक्षवेना |
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ||
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो |
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ||१७४||

सत्यस्वरुपाचा तो प्रकाश या डोळ्यांनी लक्षपूर्वक पाहूनहि लक्षात येत नाही; परंतु एकदा का सद्गुरू कृपेने तो जीवनात प्रगट होऊन या अखिल नामरूपात्मक संसाराला ग्रासू लागला की मग आटोकाट प्रयत्न करूनहि तो संसार टिकविता येत नाही. (अशा रीतीने भक्ताचा भवपाश नष्ट करून) तो दयामय अति दक्ष प्रभु आपल्या भक्ताचा नित्यसाक्षित्वाने कैवार घेऊन त्याला क्षयातीत असे अक्षय मोक्षपद देतो. ||१७४||

विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी |
परी लीहितो कोण त्याचे कपाळी ||
हरू जाळितो लोक संहारकाळी |
परी शेवटी शंकरा कोण जाळी ||१७५||

तो सृष्टिकर्ता ब्रह्मदेव प्रत्येक जीवाच्या कपाळी त्याचे भवितव्य लिहून ठेवतो असे म्हणतात. पण त्या विधीचे भवितव्य त्याच्या कपाळी कोण लिहितो बरे? प्रलयकाली भगवान शंकर सर्व सृष्टीचा संहार करतो; पण अखेरीस त्या शंकराचा संहारकर्ता कोण बरे? (तात्पर्य, कोणाचे आज्ञेने या देवतांचा प्रादुर्भाव होऊन त्यांचे कार्य ठरते व अखेरीस त्या कोणात सामावतात याचा शोध घेतला पाहिजे.) ||१७५||

जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा |
असंख्यात संख्या करी कोण शक्रा ||
जगी देव धुंडाळिता आढळेना |
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ||१७६||

ब्रह्मांडात बारा आदित्य व अकरा रुद्र आहेत. इंद्र तर इतके आहेत की, त्यांची गणनाहि करवत नाही. या विशिष्ट संख्या व संज्ञा ज्याच्यामुळे निर्माण झाल्या तो सर्व सृष्टीचा मुख्य नियामक परमेश्वर कोण आहे हे कळत नाही व या जगात त्याला शोधून काढण्याचा कितीहि प्रयत्न केला तरी तो प्रत्यक्ष गवसत नाही. ||१७६||
(बारा आदित्य - धातू, मित्र, अर्यमा, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत्, पूषन्, सवितृ, त्वष्टा व विष्णू ही सूर्याची बारा महिन्यातील बारा रूपे. अकरा रुद्र- रैवत, अज, भीम, बाम, वृषाकपि, अजैकपाद, उग्र, अहिर्बुध्न्य, बहुरूप, महान ही रुद्राची अकरा रूपे. अध्यात्मिक दृष्ट्या बारा आदित्य हे बारा महिने हेच आयुष्याचे हरण करतात - आददाना यन्ति इति. अकरा रुद्र ही दहा इंद्रिये व एक मन-देह सोडताना ही रडतात म्हणून रुद्र.)

तुटेना फुटेना कदा देवराणा |
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ||
कळेना कळेना कदा लोचनासी |
वसेना दिसेना जगी मीपणासी ||१७७||

तो देवाधिदेव साकार नसल्याने त्याच्यात तूटफूट संभवत नाही. तो सगुणहि नसल्याने त्याला चंचलत्वाचा विकारहि नाही. आपल्या परिपूर्णतेहून तो लेशमात्रहि ढळत नसल्याने, अपेक्षेअभावी, तो कधी दीनवाणाहि होत नाही. असा तो निर्गुण निराकार परमात्मा या चर्मचक्षूंना कधी दिसत नाही. त्याप्रमाणेच मीपणाचा लवलेशहि असेपर्यंत त्याचे अस्तित्वसुद्धा जाणवत नाही. ||१७७||

जया मानला देव तो पूजिताहे |
परी देव शोधूनि कोणी न पाहे ||
जगी पाहता देव कोट्यानुकोटी |
जया मानली भक्ति जे तेचि मोठी ||१७८||

जगात पाहावे तर असंख्य प्रकारचे देव आढळतात. त्यापैकी ज्याला जो आवडला त्या देवाची तो पूजाअर्चा करीत राहतो. त्यातहि ज्याला भक्तीची जी पद्धत मानवली तीच सर्वश्रेष्ठ असे त्याला वाटत असते. परंतु खरोखर देव म्हणजे काय व त्याचे सत्यस्वरूप कसे निर्गुण निराकार असते हे शोधून पाहण्याचे बहुतेक कोणीच मनावर घेत नाही. ||१७८||

तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले |
तया देवरायासि कोणी न बोले ||
जगी थोरला देव तो चोरलासे |
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ||१७९||

हे तीनहि लोक सर्व विश्व जेथून निर्माण झाले त्या देवाधीदेवाविषयी विचार करताना किंवा बोलताना बहुतेक कोणीच दिसत नाही, कारण तो परमात्मा या जगात उघडपणे वावरत नसून गुप्त असतो. त्याची ओळख होणे सद्गुरूंच्या कृपाप्रसादाशिवाय सर्वथैव अशक्यच आहे. ||१७९||

गुरु पाहता पाहता लक्ष कोटी |
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ||
मनी कामना चेटके धातमाता |
जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ||१८०||

सद्गुरुशिवाय गति नाही हे समजल्याने साधक सर्वत्र गुरूंचा शोध घेऊ लागतो व त्याला जेथे तेथे लक्षावधी, कोट्यावधी, गुरु दिसू लागतात. यापैकी कोणी विविध मंत्रशक्तीसंपन्न, तर कोणी कामनेच्या आहारी जाऊन वशीकरणादि नाना प्रकारची चेटके करणारे तर कोणी धात म्हणजे कल्पित गोष्टी सांगून भुलविणारे, तर कोणी मात म्हणजे घडलेल्या गोष्टीच फुगवून सांगणारे असे आढळतात. असले गुरु फुकट होत. यापैकी कोणीहि मुक्ति देण्यास समर्थ नव्हे हे नीट समजून असावे. ||१८०||

नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू |
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ||
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू |
जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधू ||१८१||

लक्षात असू द्या की जो अनुभूतीसंपन्न अगाध ज्ञानी व खरी साधूवृत्ती असलेला सद्गुरू असतो तो चेटके करणारा, भुलविणारा, द्रव्य उकळणारा, परनिंदा करणारा, मत्सरग्रस्त, व्यसनाधीन, उन्मत्तपणे वागणारा किंवा भक्तिहीन असा कधीहि नसतो. त्यामुळे त्याची संगती कधीच बाधक, अपकारक ठरत नाही. ||१८१||

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी |
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ||
मुखे बोलिल्यासारखे चालताहे |
मना सद्गुरू तोचि शोधूनि पाहे ||१८२||

विनाकारण फटकळ बडबड करणारा, अंतरात कामुक वासनांचा बुजबुजाट असणारा आणि प्रत्यक्ष आचरणात न आणता तत्वज्ञानाच्या केवळ बाता मारणारा खरा सद्गुरू नव्हे. मन, वाणी व आचारांत पूर्णपणे एकरूपता झाल्यामुळे जो बोलण्याप्रमाणे आपण स्वतःहि वागत असतो तोच खरा सद्गुरू होय. मना, अशाचाच कटाक्षाने शोध घे. ||१८२||
(तोंडाने माया मिथ्या म्हणावयाची व मनाने तिचीच कृपा जास्त कशी होईल याच्या युक्ति शोधत, प्रत्यक्ष लौकिक ऐश्वर्याच्या संपादणीत काळ घालवावयाचा असेच बहुविध आढळतात. म्हणून श्रीसमर्थांनी ही सूचना केली आहे.)

जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी |
कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ||
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे |
तयाचेनि योगे समाधान बाणे ||१८३||

जो आत्मज्ञानी असूनहि प्रेमळ भक्त असतो, जो वैराग्यशील असूनहि विवेकयुक्त असतो; जो कनवाळू असूनहि स्वमनाचा स्वामी असतो; जो योग सामर्थ्य संपन्न असूनहि जनात वागतांना क्षमाशील असतो; जो आश्रयदाता प्रभु असूनहि सावध (दक्ष) राहतो; जो शास्त्रवेत्ता विद्वान असूनहि प्रसंगानुरूप वागण्याचे चातुर्य जाणतो; तोच खरा सद्गुरू होय. त्याच्याच कृपाप्रसादाने नितांत समाधान बाणू शकते. ||१८३||

नव्हे तेचि जाले नसे तेचि आले |
कळो लागले सज्जनाचेनि बोले ||
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे |
मना संत आनंत शोधीत जावे ||१८४||

अनिर्वाच्य असलेले परब्रह्मस्वरुप या वैखरी वाणीने कोणाला तरी सांगता येईल का? असे असूनहि सद्गुरूंच्या सहज बोलण्याने ते स्वरूप कळून आले. ज्याच्याबद्दल कधी शक्यता वाटली नव्हती तो ब्रह्मसाक्षात्कार, त्यांच्या कृपेमुळे झाला आणि त्यामुळे जीवनात पूर्वी न गवसणारे अमृतमय परमसुख उभरून आले. म्हणून मना तूहि आता अशा अनंतस्वरुपी संतसद्गुरूंचा शोध घेत राहा (व कृतार्थ हो.) ||१८४||

लपावे अती आदरे रामरूपी |
भयातीत निश्चीत ये स्वस्वरूपी ||
कदा तो जनीं पाहताही दिसेना |
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ||१८५||

द्वैताभावामुळे भयातीत व निश्चित असलेल्या या आपल्या आत्मस्वरूपी रामरायात अति आदराने, प्रेमाने, लपून बसावे म्हणजे विलीन व्हावे. असा जो पूर्ण ऐक्यतेची सायुज्यता प्राप्त करतो तो परत कधीहि वेगळेपणाच्या भावनेने वागू शकत नाही आणि त्यामुळे जनात वावरत असूनहि, यथार्थाने त्याला कोणी पाहू शकत नाही. ||१८५||
अथवा
सद्गुरू कृपेने प्राप्त झालेल्या या रामरूप सत्स्वरुपाच्याच आश्रयाला अति प्रेमादराने नेहमी राहावे. या भयातीत म्हणूनच निश्चित अशा सुखस्वरूपातच समरसून असावे. बाबा रे, हा राम जनलौकिकात धुंडाळूनहि दिसणार, सापडणार, नाही. त्याचे व तुझ्या सत्स्वरुपाचे नेहमीचेच नितांत ऐक्य असल्याने तो कधी तुझ्याहून वेगळा असा राहत नाही आणि म्हणूनच तो बाहेर दिसणे शक्य नाही. (द्वैतामुळेच दृश्य संभवते.) ||१८५||

सदा सर्वदा राम सन्नीध आहे |
मना सज्जना सत्य शोधून पाहे ||
अखंडीत भेटी रघूराजयोगू |
मना सांडि रे मीपणाचा वियोगू ||१८६||

हे सज्जना मना, तो श्रीराम सदासर्वकाळ अगदी समीप, तुझ्याच अंतर्यामी, आहे हे सत्य शोधून पहा. मीपणामुळेच स्वस्वरूप अशा या श्रीरामाशी तुझा वियोग झाला आहे. त्या मीपणाचा त्याग कर. मीपणाशी वियोग झाल्याबरोबर त्या रघुरायाशी तुझा नित्ययोग साधेल आणि ही तुमची भेट नंतर अखंडित राहील. ||१८६||

भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे |
परी सर्वही स्वस्वरूपी न साहे ||
मना भासले सर्व काही पहावे |
परी संग सोडूनि सूखी रहावे ||१८७||

('संग त्यक्त्वा सुखी भव' या वसिष्ठोपदेशाचे रहस्य आता यापुढे श्लो. १९० पर्यंत सांगत आहेत.)
पंचमहाभूते आणि पिंड-ब्रह्मांड हेहि पाच भौतिकच असल्याने त्याचे तत्वतः ऐक्य आहे हे खरे, पण सत्स्वरुपाच्या ठायी यापैकी कशालाच वाव नाही आणि त्यांची तेथे गरजहि नाही. मनाला जसे भासते तद्वत हे नामरूपात्मक दृश्य दिसत असते, ते पाहावे; परंतु ते भ्रमयुक्त आहे हे जाणून त्यात आसक्त होऊ नये, त्याचा संग जडू देऊ नये. अशा रीतीने संगातीत होऊन स्वरूपानंदात सुखी राहावे. ||१८७||

देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे |
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे ||
विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे |
परी संग सोडूनि सूखे रहावे ||१८८||

'मी देह नव्हे' या ज्ञानमय शस्त्राने नाशिवंत अशा देहादि संघाताविषयीचे ममत्व समूळ उखडून टाकावे व अशा रीतीने देहातीत होऊन, संपूर्ण शरणागतीच्या प्रेममय भक्तीमार्गाचेच अनुसरण करावे. यामुळे विचारपूर्वक दृढावलेल्या वैराग्यबळाने, साधूसंतांनी निंद्य ठरविलेल्या अनाचाराचा सर्वथैव त्याग करावा. हे सर्व करीत असतानाहि, कर्तेपणाच्या सूक्ष्म अहंकाराचा संग जडू न देता, अनासक्त असे सुखी राहावे. ||१८८||

मही निर्मिली देव तो ओळखावा |
जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ||
तया निर्गुणालागी गूणी पहावे |
परी संग सोडूनि सूखी रहावे ||१८९||

या सृष्टीचे कारण जी महामाया ती ज्यामुळे निर्माण झाली त्या परमेश्वरास ओळखावे. आपला आत्माहि त्याचाच अंश आहे हे अनुभवाने जाणताक्षणीच जीवत्वापासून मुक्ति मिळते. या सर्व सगुणदृश्याच्या पोटी आधारभूत असलेल्या त्या निर्गुण परमात्म्यालाच पाहण्याची नेहमी सवय लावावी. मात्र संसृतीस कारण असा जो वेगळेपणा त्याचा संग जडू न देता, त्या परमात्म्यातच समरसून जाऊन सुखस्वरूप असावे. ||१८९||

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता |
परेहून पर्ता न लिंपे विवर्ता ||
तया निर्विकल्पासि कल्पीत जावे |
परी संग सोडूनि सूखी रहावे ||१९०||

तो सत्स्वरूप परमात्मा सृष्टीचा प्रत्यक्ष कर्ता नव्हे व तिचे भरणपोषण करणाराहि नव्हे. सर्वापर असा जो ज्ञानमय (एकोSहं) हरिसंकल्प त्याहूनहि तो अतीत असल्याने, अविद्येच्या (बहुस्याम्) भ्रमापासूनहि केवळ अलिप्तच आहे. अशा त्या निर्विकल्प परब्रह्म सत्स्वरुपाचेच, ज्ञातेपणाचा संग जडू न देता, चिंतन करीत राहावे आणि तत्स्वरूप होऊन केवळ सुखमय असावे. ||१९०||

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना |
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ||
परब्रह्म ते मीपणे आकळेना |
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ||१९१||

इतके सारे कळूनहि, देहात्म बुद्धीच्या अंतःकरणात खोल रुजलेला निश्चय ज्या अभाग्याचा टळत नाही त्याला अनुभवाचे ज्ञान, केव्हाहि कल्पांतापर्यंत साधन करूनहि होऊ शकणार नाही. त्याचे मन अज्ञानमय असल्याने एक तर दृश्य पाहते किंवा दृश्याभावी शून्यत्वात जखडले जाते. हा त्याच्या मनाचा स्वभाव मावळत नाही व मीपण हे शिल्लक राहतेच, आणि मीपण अंशमात्रहि असेपर्यंत परब्रह्माचे यथार्थ आकलन होणे नितांत अशक्यच होय. ||१९१||

मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे |
दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे ||
तया खूण ते हीन दृष्टांत पाहे |
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ||१९२||

जे मनाला दिसू व कळू शकत नाही त्या सर्वोत्तम सत्स्वरूपाचे ध्यान म्हणजे वेगळेपणरहित असे केवळ तदैक्यच होय. त्याची खूण सांगण्यासाठी दृष्टांताचा उपयोग करतात, पण ते दृष्टांत नेहमी अपूर्णच होत. संग आणि संगराहित्य या दोन्ही कल्पना सापेक्ष असल्याने, नितांत निरपेक्ष अशा केवळ स्वरूपात त्याचा काही संबंध नाही. ||१९२||

नव्हे जाणता नेणता देवराणा |
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ||
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा |
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ||१९३||

ते सत्स्वरूप केवलाद्वैत व परिपूर्ण असल्याने तेथे तदितर कशालाहि स्थान नाही म्हणून द्वैताभावी त्यास जाणता वा नेणता या गुणमय नावाने संबोधिता येत नाही. वेद-शास्त्र-पुराणांनाहि त्याचे यथार्थ अचूक वर्णन करता आले नाही. ते सत्स्वरूप दृश्य तर नव्हेच, पण दृश्याभावी अदृश्य शून्यहि नव्हे, इतकेच नाही तर दृश्यादृश्याचा जाणता साक्षीहि नव्हे. श्रुतींनाहि त्याचा थांग न लागल्याने शेवटी 'नेति' 'नेति' म्हणत स्वस्थ बसावे लागले. ||१९३||

वसे हृदयी देव तो कोण कैसा |
पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा ||
देहे टाकिता देव कोठे रहातो |
परी मागुता ठाव कोठे पहातो ||१९४||

हे विलक्षण वर्णन ऐकून साधक आदरपूर्वक विचारतो की, ज्याला हृदयनिवासी म्हणून शास्त्रादिकांनी म्हटले तो देव तरी कोणता व कसा आहे? हा देह (व त्या बरोबर ते हृदयहि) सोडल्यावर तो देव राहतो तरी कोठे? नंतर पुन्हा जन्मान्तरात शरीरांतर्गत हृदयात कोठून व कसा येतो? ||१९४||

वसे हृदयी देव तो जाण ऐसा |
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ||
सदा संचला येत ना जात काही |
तयावीण कोठे रिता ठाव नाही ||१९५||

(वरील प्रश्नांमधील गर्भित शून्यत्वाचे निराकरणार्थ सांगतात की,) ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापी आहे तसा हा हृदयनिवासी देवहि सर्वत्र सर्वव्यापी आहे. त्याच्याविना कोठे रिकामी अशी जागाच नसल्याने तो कोठे जात नाही व कोठून येतहि नाही. तो सर्वदा सर्वत्र घनदाटपणे विद्यमान असाच असतो. ||१९५||

नभी वावरे जो अणूरेणु काही |
रिता ठाव या राघवेवीण नाही ||
तया पाहता पाहता तेंचि जाले |
तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले ||१९६||

(आकाशात तर हे सारे दृश्य दिसते, म्हणून सांगतात की,) या आकाशात जे सूक्ष्मातिसूक्ष्म अणू-रेणू वावरत असतील त्यातहि हा सत्स्वरूप राघवच ओतप्रोत भरलेला आहे; त्याच्याविना अशी रिकामी जागा कोठेहि नाहीच नाही. त्याचे वैलक्षण्य असे की त्याला पाहता पाहता पाहणाराच सर्वस्वी तत्स्वरूप होऊन जातो तेथे मग तदितर लक्ष्य, लक्षिता व लक्षिण्याची क्रिया इत्यादि सर्वहि मायिक त्रिपुटी समूळ नष्ट झालेल्या असतात. ||१९६||

नभासारिखे रूप या राघवाचे |
मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे ||
तया पाहता देहबुद्धि उरेना |
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ||१९७||

अशा या आकाशाप्रमाणे सर्वव्यापी राघवस्वरूपाचे चिंतन मनात अखंड होत राहिल्यास संसृतीचे मूळच (वासनामय आसक्ती) तुटून जाते. कारण मनात एका वेळी एकच चिंतन होणे शक्य होते. त्याच्या नुसत्या दर्शनाने देहबुद्धीचा, मीपणाचा नाश होतो; परंतु कायमची तृप्ती न होता, सदासर्वदा नित्यदर्शनाची तळमळ वाढतच जाते. ||१९७||
(असे का व्हावे? या दिव्य दर्शनातहि दर्शन देणारा व ते घेणारा असे सूक्ष्म द्वैत असल्याने पूर्ण तद्रूपतेशिवाय निरंतरची तृप्ति होत नसते. याचेच स्पष्टीकरण पुढे श्लो. २०१ पर्यंत आहे.)

नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे |
रघूनायका ऊपमा ते न साहे ||
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे |
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ||१९८||

आकाश सर्व सृष्टीस व्यापून आहे हे खरे; पण या आकाशाची उपमा सत्स्वरूप राघवाला साजेशी नाही. कारण त्या उपमेत व्याप्यव्यापकपणाचा द्वैतभाव अंतर्भूत आहे. जेथे दुसरे असे काहीहि नाही असे हे केवळ अद्वैत सत्स्वरूप स्वप्रतिष्ठेनेच तेच ते असे सर्वत्र विद्यमान आहे; म्हणून व्याप्याभावी त्यास उगाच व्यापक तरी कसे म्हणावे बरे? ||१९८||

अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे |
तेथे तर्क संपर्क तोही न साहे ||
अती गूढ ते दृश्य तत्काळ सोपे |
दुजेवीण जे खूण स्वामिप्रतापे ||१९९||

ते सत्स्वरूप अतिजीर्ण म्हणजे अत्यंत पुरातन, अनादि व अतिविस्तीर्ण म्हणजे असीम, अमर्याद अनंत आहे. ते इतके अतर्क्य आहे की तेथे तर्काचे सामर्थ्य लवलेशहि चालत नाही. दुजेपणाने पाहू गेल्यास जे अतिगुह्य, अगम्य, वाटते तेच अनन्यभावाने पाहिल्यास तत्क्षणात सोपे, सुगम होऊन, निःशंकपणे पक्के ठसावते. 'अनन्यत्वाची' ही खूण, हे वर्म सद्गुरूकृपाप्रसादानेच कळून येते. ||१९९||

कळे आकळे रूप ते ज्ञान होता |
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ||
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे |
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ||२००||

आणि अनन्यतेचे हे वर्म कळले, त्याचे ज्ञान झाले, की स्वरूपाविषयी सर्व काही सहजपणे कळून येते, आकलन होते, अनुभवास येते. स्वरुपानुभूतीमध्ये सर्वसाक्षित्वाची द्वैतमय अवस्थाहि पूर्णपणे नष्ट होते, मनाला संकल्पातीतता प्राप्त होते, वाणी मूक बनते, शब्दाचे कार्य संपल्याने शब्दच स्फुरत नाहीत. अशा वेळी मीपणरहित असलेला जो केवळ निजानंद तोच तो सत्स्वरूप राम अंतर्बाह्य कोठेहि पहा तोच तो राम सर्वत्र विद्यमान आहे. ||२००||

कदा ओळखीमाजि दूजे दिसेना |
मनी मानसी द्वैत काही वसेना ||
बहूतां दिसां आपली भेटि जाली |
विदेहीपणे सर्व काया निवाली ||२०१||

एकदा का त्या सत्स्वरूप रामरायाची निजांतरी ऐक्यभावाने ओळख पटली की मग अन्वय पध्दतीने कोठेहि पाहिले तरी त्याशिवाय दुसरे काही दिसणार नाही; कारण व्यवहारी बाह्य मनात व त्याच्याहि आतल्या अंतर्मनात, या ओळखीमुळे, द्वैताला अजिबात वावच नसतो. त्याच्या प्रत्येक बोधाबोधातून तेच एकमेव स्वरूप प्रतीत होत असते ('प्रतिबोधविदितं मतम् |') अशा रीतीने अनेक जन्मजन्मान्तरानंतर आपली आपल्याशी झालेल्या या अप्रतिम भेटीमुळे मीपणाचे कार्यच संपल्याने, विदेहपण बाणले आणि त्यामुळे अंतर्बाह्य सर्व काया समाधानाने पूर्ण शांत झाली. ||२०१||

मना गूज रे तूज हे प्राप्त झाले |
परी अंतरी पाहिजे यत्न केले ||
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी |
धरी सज्जनीं संगती धन्य होसी ||२०२||

(आता उपसंहार करताना सांगतात की,) मना रे, साक्षात्काराचे हे गुरुगुह्य तुला आता ज्ञात झाले आहे. ही ज्ञानज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी तुला प्रयत्न केले पाहिजेत. पुन्हा पुन्हा श्रवण, मनन व निदिध्यासनाने आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ, दृढतर करीत राहिले पाहिजे म्हणजे तो अढळ होईल. त्यासाठी अशा स्वानुभवी सत्जनांची, साक्षात्कारी महानुभावांची, संगती धर म्हणजे तुला ही धन्यता सहज लाभेल. ||२०२||

मना सर्वही संग सोडूनि द्यावा |
अती आदरे सज्जनाचा धरावा ||
जयाचेनि संगे महादुःख भंगे |
जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ||२०३||

(संगः सर्वात्मना त्याजः, न चेत् शक्तुं सद्भिरेव कर्तव्यः| या योगवासिष्ठाच्या सिद्धांताचे विवरण सांगतात की,) केवलाद्वैत परब्रह्म हे एकटे एकच एक असल्याने ते संगातीत असते व आपणहि तेच असल्याने, सर्वहि अंतरबाह्य संग सोडून संगातीत असे केवळ सत्स्वरुपानेच आपण राहायला हवे, जर शक्य होत नसेल तर मात्र सज्जनाचाच संग आवर्जून अत्यादरपूर्वक धरावा. जीवनमुक्तांच्या संगतीच्या सामर्थ्याने, जन्ममरणादि महादुःखाचे निवारण होऊन, आपणहि जीवनमुक्तीच्या सन्मार्गाला आपोआपच लागतो; मग मीपण वाढविणारा कृत्रिम साधनांचा व्यर्थ खटाटोप करावा लागत नाही. ||२०३||

मना संग हा सर्वसंगास तोडी |
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ||
मना संग हा साधना शीघ्र सोडी |
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ||२०४||

साधकांनी हा सत्संग धरल्यावर त्याच्या प्रभावाने इतर सर्व आब्रह्मस्तंभ संगाचे, आसक्तीचे निवारण होते अशा रीतीने निःसंग झालेल्या साधकांचे मीपणाचे द्वैतहि निःशेष मोडून हा सत्संग त्यांना अंतर्बाह्य मोकळे करतो आणि मग अर्थातच तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. ||२०४||

मनाची शते ऐकता दोष जाती |
मतीमंद ते साधना योग्य होती ||
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी |
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ||२०५||

(आता ग्रंथाची फलश्रुति सांगतात की,) मनाच्या श्लोकांची ही शतके नीटपणे ऐकली अभ्यासली, समजून घेतली, तर सर्व दोषांची, प्रतिबंधांची, निवृत्ती होऊन मंदबुद्धीचे लोकहि परमार्थ साधनाचे अधिकारी होतात. नंतर ते जसजसे साधन करीत जातील तसतसा त्यांच्या अंगी ज्ञानोदय होत जाईल व वैराग्यरूपी सामर्थ्य चढतेवाढते दृढ होत जाईल (श्रीसमर्थ राम) दास आश्वासन देतात की, या सांगण्यावर ज्याचा निःसंदेह आढळ विश्वास बसेल तो जीवन्मुक्तीचा स्वानंद अखंड उपभोगीत राहील. ||२०५||

|| श्रीराम समर्थ || जय जय रघुवीर समर्थ ||