॥ श्री पंचरत्न हरिपाठ ॥
॥ श्री पंचरत्न हरिपाठ ॥
१ श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
॥ श्री गणेशाय नमः ॥
१
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥
२
चहूं वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तूं दुर्गमा न घालीं मन ॥ ३ ॥
पाठभेद -वायां दुर्गमी न घालीं मन
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥
३
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥
सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २ ॥
अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४
४
भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १ ॥
सायासें करिसी प्रपञ्च दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४ ॥
५
योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १ ॥
भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३ ॥
ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४ ॥
६
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४ ॥
७
पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥ १ ॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरीसी न भजत दैवहत ॥ २ ॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥ ४ ॥
८
संतांचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १ ॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥ २ ॥
एकतत्त्वी नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ ३ ॥
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ ४ ॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ५ ॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥
९
विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥ १ ॥
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २ ॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचें ॥ ४ ॥
१०
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ १ ॥
नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २ ॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४ ॥
११
हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥ १ ॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपता हरी ॥ २ ॥
हरिउच्चारण मंत्र पैं अगाध । पळे भूतबाधा भय याचें ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥ ४ ॥
१२
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी । वायांची उपाधी करिसी जनां ॥ १ ॥
भावबळें आकळे येरवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरी ॥ २ ॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥ ४ ॥
१३
समाधि हरीची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥ १ ॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजे सकळ सिद्धि ॥ २ ॥
ऋद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥ ३ ॥
ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥
१४
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥ १ ॥
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥ २ ॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निज स्थान ॥ ४ ॥
१५
एक नाम हरि द्वैतनाम दूरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरी । शमदमां वरी हरि झाला ॥ २ ॥
सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥ ४ ॥
१६
हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥ १ ॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धि ॥ २ ॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निमाले साधुसंगे ॥ ३ ॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । तेणें दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥
१७
हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥ २ ॥
मतृपितृभ्रात सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥ ३ ॥
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥ ४ ॥
१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणे कोणी ॥ १ ॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटण ॥ २ ॥
मनोमार्गें गेला तो तेथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥
१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥ १ ॥
अनंत जन्मांचें तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥ २ ॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठी ॥ ३ ॥
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरीविण नेम नाहीं दुजा ॥ ४ ॥
२०
वेदशास्त्रपुराण श्रुतीचें वचन । एक नारायण सारा जप ॥ १ ॥
जप तप कर्म हरीविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥ २ ॥
हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥ ३ ॥
ज्ञानदेवीं मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥ ४ ॥
२१
काळ वेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥ १ ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥ २ ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥ ३ ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ मार्ग सोपा ॥ ४ ॥
२२
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्षुमीवल्लभ तयां जवळी ॥ १ ॥
नारायण हरी नारायण हरी । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥ २ ॥
हरिविण जन्म नर्कचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ ३ ॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥ ४ ॥
२३
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १ ॥
तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥ २ ॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३ ॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥ ४ ॥
२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १ ॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥ २ ॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्त ॥ ३ ॥
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४ ॥
२५
जाणीव नेणीव भगवंतीं नाही ।न् । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥
नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥ २ ॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥ ३ ॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥ ४ ॥
२६
एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥ १ ॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥ २ ॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणि पंथा जाशी झणी ॥ ३ ॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४ ॥
२७
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १ ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥ २ ॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥
निजवृत्ति हे काढी माया तोडी । इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४ ॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५ ॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥ ६ ॥
२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥ १ ॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥ २ ॥
असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करून स्मरण जीवी ॥ ३ ॥
अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ४ ॥
संतसज्जनानीं घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं तरें ॥ ५ ॥
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥ ६ ॥
२९
कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १ ॥
मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा याच देहीं ॥ २ ॥
देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४ ॥
॥ इति श्रीज्ञानदेव हरिपाठ समाप्त ॥
२ श्रीनामदेवमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
१
नामाचा महिमा कोण करी सीमा । जपावें श्रीरामा एका भावें ॥ १ ॥
न लगती स्तोत्रें नाना मंत्रें यंत्रें । वर्णिजे बा वक्त्रें श्रीरामनाम ॥ २ ॥
अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत ॥ ३ ॥
नामा म्हणें नाम महाजप परम । तो देह उत्तम मृत्युलोकीं ॥ ४ ॥
२
जन्माचें कारण रामनामपाठीं । जाइजे वैकुंठीं एकीहेळा ॥ १ ॥
रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल आपैसा इहलोकीं ॥ २ ॥
दो अक्षरीं राम जप हा परम । नलगे तुज नेम नाना पंथ ॥ ३ ॥
नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र । उद्धरिते गोत्र पूर्वजेंसी ॥ ४ ॥
३
विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥ १ ॥
सर्वही लटिकें जाण तूं बा निकें । रामाविण एकें न सुटिजे ॥ २ ॥
मायाजाळ मोहें इंद्रियांचा रोहो । परि न धरेचि भावो भजनपंथें ॥ ३ ॥
नामा म्हणे देवा करीं तूं लावलाही । मयूराचा टाहो घनगर्जना ॥ ४ ॥
४
कांसवीचे दृष्टी जैं येईजे भेटी । तैं अमृताची सृष्टी घडे त्यासी ॥ १ ॥
तैसें हें भजन श्रीरामाचें ध्यान । वाचे नारायण अमृतमय ॥ २ ॥
धन्य त्याचें कुळ सदा पैं सुफळ । दिननिशीं पळ रामनाम ॥ ३ ॥
नामा म्हणे चोखट भक्त तो उत्तम । वाचेसी सुगम रामनाम ॥ ४ ॥
५
सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ । वंदी कळिकाळ शास्त्र सांगे ॥ १ ॥
ब्रह्मांडनायक ऐसें जें कौतुक । तेंचि नाम एक श्रीकृष्ण ऐसें ॥ २ ॥
आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा । परिपूर्ण सरिता अमृताची ॥ ३ ॥
नामा म्हणे अनंत कां करिशी संकेत । उद्धरिले पतित युगायुगीं ॥ ४ ॥
६
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । तो उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥ १ ॥
नारायण नारायण हेंचि पारायण । उद्धरले जन इहलोकीं ॥ २ ॥
तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवौद्धारणा नाम स्मरा ॥ ३ ॥
नामा म्हणे राम हा जप परम । न लगती नेम नाना कोटी ॥ ४ ॥
७
तीर्थ जपराशी जप हृषीकेशी । मुखीं अहर्निशीं रामनाम ॥ १ ॥
तीर्थाचें पैं तीर्थ नाम हें समर्थ । होईल कृतार्थ रामनामें ॥ २ ॥
होईल साधन तुटेल बंधन । वाचे जनार्दन सुफळ सदा ॥ ३ ॥
नामा म्हणे हरी उच्चार तूं करीं । उद्धरसी निर्धारीं इहलोकीं ॥ ४ ॥
८
पाहतां ये परिपाटी आणिक नाहीं सृष्टी. नामेंविण दृष्टीं न दिसे माझ्या ॥ १ ॥
नमचि समर्थ नामचि मथित । शंकरासी हेत रामनामीं ॥ २ ॥
भरती सर्व काम वाचे रामनाम । न लगती ते नेम कर्मजाळ ॥ ३ ॥
नामा म्हणे उच्चार न करीं तूं विचार । तुटेल येरझार नाना योनी ॥ ४ ॥
९
तपाचें हें तप राम हें अमूप । करीं का रे जप रामनामीं ॥ १ ॥
रामकृष्ण म्हणे वाचे नारायण । तुटेल बंधन यमपाश ॥ २ ॥
साधेल साधन होती कोटी यज्ञ । राम जनार्दन जपे करीं ॥ ३ ॥
नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी । म्हणे नरहरी एक्या भावें ॥ ४ ॥
१०
हाचि नेम सारीं साधेल तो हरी । नाम हें मुरारी अच्युताचें ॥ १ ॥
राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे । यादव मोहरे रामनाम ॥ २ ॥
न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचे ॥ ३ ॥
नाम म्हणे राम आम्हां हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हां ॥ ४ ॥
११
करूं हें कीर्तन राम नारायण । जनीं जनार्दन हेंचि देखें ॥ १ ॥
जगाचा जनक रामकृष्ण एक । न करितां विवेक स्मरें राम ॥ २ ॥
तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥ ३ ॥
नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ॥ ४ ॥
१२
मायेचीं भूचरे रज तम सात्त्विक । रामनाम एक सोडवणें एक ॥ १ ॥
राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । नामें घडती यज्ञ कोटी देवा ॥ २ ॥
न लगती साधनें नाना मंत्र विवेक । रामनामीं मुख रंगवी कां रे ॥ ३ ॥
नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां. नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ॥ ४ ॥
१३
माझें मी करितां गेले हे दिवस । न धरीच विश्वास राम नामीं ॥ १ ॥
अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी । राम पंचाक्षरी मंत्रसार ॥ २ ॥
कां करिशी सांठा प्रपंच विस्तार. न तुटे येरझार नामेंविण ॥ ३ ॥
नामा म्हणे ऐसें रामनामीं पिसें । तो उद्धरेल आपैसें इहलोकीं ॥ ४ ॥
१४
नको नको माया सांडीं लवलाह्या । पुढील उपाया झोंबें कां रे ॥ १ ॥
राम नाम म्हणे तुटेल बंधन । भावबंधमोचन एक्या नामें ॥ २ ॥
स्मरतां पतित उद्धरेल यतार्थ । नाम हाचि स्वार्थ तया झाला ॥ ३ ॥
नामा म्हणे हा जप करी तूं अमूप । नामें चुके खेप इये जनीं ॥ ४ ॥
१५
स्मरण करितां रामनामध्वनी । ऐकतांचि कर्णीं पळती यम ॥ १ ॥
नामपाठ करा राम कृष्ण हरी । होतील कामारी ऋद्धि सिद्धि ॥ २ ॥
साध्य तेंचि साधीं न करी उपाधी । जन्मांतरीच्या व्याधी हरती नामें ॥ ३ ॥
नामा म्हणे सर्व राम हाचि भाव । नाहीं आणिक देव रामेंविण ॥ ४ ॥
१६
रामकृष्णमाळा घालितां अढळ । तुटेल भवजाळ मायामोह ॥ १ ॥
होशील तूं साधु न पावती बाधु । पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टेल तुज ॥ २ ॥
जपतां रामनाम पुरती सर्व काम । आदि अंति नेम साधेल तुज ॥ ३ ॥
नामा म्हणे कृतार्थ सर्व मनोरथ । न लगती ते अर्थ मायापाश ॥ ४ ॥
१७
शरीर संपत्ती मायेचें टवाळ । वायांचि पाल्हाळ मिरवितोसी ॥ १ ॥
नाम हेचि तारी विठ्ठलनिर्धारीं । म्हणे हरी हरी एक वेळां ॥ २ ॥
स्मरतां गोपाळनामा वंदितील यम । न लगती नेम मंत्रबाधा ॥ ३ ॥
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम । राम हेंचि नाम स्मरें कां रे ॥ ४ ॥
१८
कृष्णकथा संग जेणें तुटे पांग । न लगे तुज उद्योग करणें कांहीं ॥ १ ॥
समर्थ सोयरा राम हा निधान । जनीं जनार्दनीं एक ध्यायी ॥ २ ॥
नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार । तुटेल येरझार भवाब्धीची ॥ ३ ॥
१९
भवाब्धीतारक रामकृष्ण नांव । रोहिणीची माव सकळ दिसे ॥ १ ॥
नाम हेंचि थोर नाम हेंचि थोर । वैकुंठीं बिढार रामनामें ॥ २ ॥
राम हे निशाणी जपतांची अढळ । वैकुंठ तात्काळ तया जीवा ॥ ३ ॥
नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल । अंतीं तुज पावेल राम एक ॥ ४ ॥
२०
जळाचा जळबिंदु जळींच तो विरे । तैसें हें विधारे पांचाठायीं ॥ १ ॥
जीव शिव विचार नाम हें मधुर । जिव्हेसी उपचार रामनाम ॥ २ ॥
रामनाम तारक शिव षडक्षरी । तैची वाचा करीं अरे मूढा ॥ ३ ॥
नामा म्हणे ध्यान शिवाचें उत्तम । मंत्र हा परम रामनाम ॥ ४ ॥
२१
करितां हरिकथा नाम सुखराशी । उद्धरी जीवासी एका नामें ॥ १ ॥
तें हें रामनाम जपे तूं सप्रेम । जप हा सुगम सुफळ सदा ॥ २ ॥
नामेंचि तरले नामेंचि पावले । नाम म्हणतां गेले वैकुंठासी ॥ ३ ॥
नामा म्हणे एका नामेंसी विनटे । ते वैकुंठींचे पेठे पावले देखा ॥ ४ ॥
२२
नामावांचूनि कांहीं दुकें येथें नाहीं । वेगीं लवलाहीं राम जपा ॥ १ ॥
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ । पावसी केवळ निजपद ॥ २ ॥
धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध । नामेंचि चित्पद पावले देख ॥ ३ ॥
नामा म्हणे राम वाचे जपा नाम । संसार भवभ्रम हरे नामें ॥ ४ ॥
२३
म्हणतां वाचे नाम वंदी तया यम । काळादिक सम वंदी तया ॥ १ ॥
ऐसें नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ । उच्चारितां नीट वैकुंठ गाजे ॥ २ ॥
तो हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा. न कळे तया उपमा आदिअंतीं ॥ ३ ॥
नामा म्हणे पाठें नामाचेनि वाटें । तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी ॥ ४ ॥
२४
विष्णुनाम श्रेष्ठ गाती देवऋषी । नाम अहर्निशी गोपाळाचें ॥ १ ॥
हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि । असे चराचरीं जनार्दना ॥ २ ॥
आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी । उमेप्रति करी उपदेश ॥ ३ ॥
नामा म्हणे नाम महाजप परम । शंकरासी नेम दिनदिशीं ॥ ४ ॥
२५
कां करतोसी सीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज ॥ १ ॥
राम कृष्ण हरी नारायण गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ ॥ २ ॥
वंदील तो यम कळिकाळ सर्वदा । न पावसी आपदा असत देही ॥ ३ ॥
नामा म्हणे ओळंग शीण झाला संगें । प्रपंच वाउगे सांडी परते ॥ ४ ॥
२६
नामाचेनि पाठे जातील वैकुंठें । तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥ १ ॥
विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाही शस्त्र नामाविण ॥ २ ॥
पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गेले ॥ ३ ॥
नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी । जन्माची येरझारी हरे नामें ॥ ४ ॥
२७
सर्वांभूतीं भजें नमन करीं संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥ १ ॥
ऐसी भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥ २ ॥
न लगतीं साधनें वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥ ३ ॥
नामा म्हणे थोर नामचि साधार । वैकुंठीं बिढार तयां भक्ता ॥ ४ ॥
२८
तूं तव नेणता परि हरि तो जाणता । आहे तो समता सर्वां भूतीं ॥ १ ॥
सर्वब्रह्म हरि एकचि निर्धारी । होशी झडकरी ब्रह्म तूंचि ॥ २ ॥
अच्युत माधव अमृताच्या पाठें । लागतांचि वाते वंदी यम ॥ ३ ॥
नामा म्हणे होशी जिवलग विष्णूचा । दास त्या हरीचा आवडता ॥ ४ ॥
२९
कां करिसी सोस मायेचा असोस । नव्हे तुझा सौरस नामेंविण ॥ १ ॥
नामचेचि मंत्र नामचेचि तंत्र । नामविण पवित्र न होती देखा ॥ २ ॥
तिहीं लोकीं काहीं नामेंविण सर्वथा । अच्युत म्हणतां पुण्यकोटी ॥ ३ ॥
नामा म्हणे ब्रह्म आदि अंतीं नेम । तें विटेवरी सम उभें असे ॥ ४ ॥
३०
पवित्र परिकर हा उच्चार । उद्धरण साचार जगासी या ॥ १ ॥
गोविंद केशव उच्चारीं श्रीराम । न लगती नेम अमूप जप ॥ २ ॥
तें हें विठ्ठलरूप पिकलें पंढरीं । नाम चराचरीं विठ्ठल ऐसें ॥ ३ ॥
नामा म्हणे विठ्ठल सर्वांत सखोल । उच्चारितां मोल न लगे तुज ॥ ४ ॥
३१
पोशिसी शरीर इंद्रियांची बाधा । शेखीं तें आपदा करील तुज ॥ १ ॥
नव्हे तुझें हित विषय पोषितां । हरी हरी म्हणतां उद्धरसी ॥ २ ॥
वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी । परी नाम न म्हणसी अरे मूढा ॥ ३ ॥
नामा म्हणे हेचि पंढरीये निधान । उच्चारिता जन तरले ऐसें ॥ ४ ॥
३२
विषय खटपट आचार सांगसी । विठ्ठल न म्हणसी अरे मूढा ॥ १ ॥
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी । अंतीं हा निर्धारीं तारील सत्य ॥ २ ॥
न लगे सायास करणें उपवास । नामाचा विश्वास ऐसा धरीं ॥ ३ ॥
नामा म्हणे प्रेम धरीं सप्रेम । विठ्ठल हाचि नेम दिनदिशीं ॥ ४ ॥
३३
नव्हे तुज हित म्हणतां विषय पोषिता । हरी हरी म्हणतां तरशील ॥ १ ॥
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी । वेगीं हें उच्चारीं लवलाहीं ॥ २ ॥
घडतील यज्ञ पापें भग्न होत । प्रपञ्च सर्वत्र होईल ब्रह्म ॥ ३ ॥
नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा । उद्धरसी सर्वथा भाक माझी ॥ ४ ॥
३४
उपदेश सुगम आइके रे एक । नाम हें सम्यक विठ्ठलाचें ॥ १ ॥
जनीं जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ॥ २ ॥
साधेल निधान पुरेल मनोरथ । नामेंचि कृतार्थ होसी जनी ।न् ॥ ३ ॥
नामा म्हणे नाम घेई तूं झडकरी । पावशी निर्धारीं वैकुंठपद ॥ ४ ॥
॥ इति श्रीनामदेव हरिपाठ समाप्त ॥
३ श्री एकनाथमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
१
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ १ ॥
हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥ २ ॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥ ३ ॥
हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥ ४ ॥
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
२
हरि बोला हरि बोला नातरी अबोला । व्यर्थ गलबला करूं नका ॥ १ ॥
नको अभिमान नको नको मान । सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥ २ ॥
सुखी त्याणें व्हावें जगा निववावें । अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥ ३ ॥
मार्ग जया कळे भावभक्तिबळें । जगाचिये मेळे न दिसती ॥ ४ ॥
जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ५ ॥
३
ओळखिला हरी धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥ १ ॥
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे । नेलें राजहंसें पाणी काय ॥ २ ॥
काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानानें सगुण ओस केलें ॥ ३ ॥
केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजले मेले ऐसे किती ॥ ४ ॥
एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगें ॥ ५ ॥
४
जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥ १ ॥
वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥ २ ॥
वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ॥ ३ ॥
आदि मध्य अवघा हरि एक । एकाचे अनेक हरि करी ॥ ४ ॥
एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही । एका जनार्दनीं ऐसें केलें ॥ ५ ॥
५
नामाविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा काळसर्प आहे ॥ १ ॥
वाचा नव्हे लांब जळो त्याचें जिणें । यातना भोगणें यमपुरीं ॥ २ ॥
हरीविण कोणी नाहीं सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचे ॥ ३ ॥
अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती । साधूचे संगतीं हरी जोडे ॥ ४ ॥
कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही । एका जनार्दनीं पाठ केलीं ॥ ५ ॥
६
धन्य माय व्याली सुकृताचें फळ । फळ निर्फळ हरीविण ॥ १ ॥
वेदांताचें बीज हरि हरि अक्षरें । पवित्र सोपारें हेंचि एक ॥ २ ॥
योग याग व्रत नेम दानधर्म । नलगे साधन जपतां हरि ॥ ३ ॥
साधनाचें सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ॥ ४ ॥
नित्य मुक्त तोचि एक ब्रह्मज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
७
बहुतां सुकृतें नरदेह लाधला । भक्तीविण गेला अधोगती ॥ १ ॥
पाप भाग्य कैसे न सरेचि कर्म । न कळेचि वर्म अरे मूढा ॥ २ ॥
अनंत जन्मींचें सुकृत पदरीं । त्याचे मुखीं हरि पैठा होय ॥ ३ ॥
राव रंक हो कां उंच नीच याती । भक्तीविण माती मुखीं त्याच्या ॥ ४ ॥
एका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ती सायुज्यता पाठी लागे ॥ ५ ॥
८
हरिनामामृत सेवी सावकाश । मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें ॥ १ ॥
नित्य नामघोष जयाचे मंदिरीं । तेचि काशीपुरी तीर्थक्षेत्र ॥ २ ॥
वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे । अविनाशासी पाहे नाश कैचा ॥ ३ ॥
एका तासामाजीं कोटि वेळा सृष्टी । होती जाती दृष्टि पाहें तोचि ॥ ४ ॥
एका जनार्दनीं ऐसें किती झालें । हरिनाम सेविलें तोचि एक ॥ ५ ॥
९
भक्तीविण पशु कशासी वाढला । सटवीने नेला कैसा नाहीं ॥ १ ॥
काय माय गेली होती भूतापासीं । हरि न ये मुखासी अरे मूढा ॥ २ ॥
पातकें करिता पुढें आहे पुसता । काय उत्तर देतां होशील तूं ॥ ३ ॥
अनेक यातना यम करवील । कोण सोडवील तेथें तुजला ॥ ४ ॥
एका जनार्दनीं सांगताहें तोंदें । आहा वाचा रडे बोलतांचि ॥ ५ ॥
१०
स्वहिताकारणें संगती साधूची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥ १ ॥
हरि तेथें संत संत तेथें हरी । ऐसें वेद चारी बोलताती ॥ २ ॥
ब्रह्मा डोळसातें वेदार्थ ना कळे । तेथें हे आंधळे व्यर्थ होती ॥ ३ ॥
वेदार्थाचा गोंवा कन्याअभिलाष । वेदें नाहीं ऐसें सांगितलें ॥ ४ ॥
वेदांचीं हीं बीजाक्षरें हरी दोनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
११
सत्पद तें ब्रह्म चित्पद तें माया । आनंदपदीं जया म्हणती हरी ॥ १ ॥
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ॥ २ ॥
तत्सदिति ऐसें पैल वस्तूवरी । गीतेमाजी हरि बोलियेले ॥ ३ ॥
हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ॥ ४ ॥
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदें तिनी । एका जनार्दनीं तेंचि झालें ॥ ५ ॥
१२
नाकळे तें कळे कळे तें नाकळे । वळे तें ना वळें गुरुविणें ॥ १ ॥
निर्गुण पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥ २ ॥
बहुरूपी घरी संन्यासाचा वेष । पाहोन तयास धन देती ॥ ३ ॥
संन्याशाला नाहीं बहुरूपियाला । सगुणीं भजला तेथें पावे ॥ ४ ॥
अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ५ ॥
१३
ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटी दुःख कैंचें ॥ १ ॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥ २ ॥
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरि मुखें गाय नित्य नेमें ॥ ३ ॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥ ४ ॥
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
१४
हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतां खेळतां हरि बोला ॥ १ ॥
हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥ २ ॥
हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं । देहत्यागाअंतीं हरि बोला ॥ ३ ॥
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥ ४ ॥
हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
१५
एक तीन पांच मेळा पञ्चवीसांच । छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ॥ १ ॥
कल्पना अविद्या तेणे झाला जीव । मायोपाधी शिव बोलिजेति ॥ २ ॥
जीव शिव दोन्ही हरिरूपीं तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरी ॥ ३ ॥
शुक्तीवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जूवरी भासे मिथ्या सर्प ॥ ४ ॥
क्षेत्र-क्षेत्रज्ञातें जाणताती ज्ञानी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
१६
कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥ १ ॥
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥ २ ॥
इच्छावे ते जवळी चरण हरीचे । चरण सर्व नारायण देतो तुज ॥ ३ ॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥ ४ ॥
एका जनार्दनीं सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥ ५ ॥
१७
काय पद्मनीचे षंढासी सोहळे । वांझेसी दोहाळे कैची होती ॥ १ ॥
अंधापुढें दीप खरासी चंदन । सर्पासी दुधपान करूं नये ॥ २ ॥
क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥ ३ ॥
खळाची संगती उपयोगासी न ये । आपणा अपाय त्याचे संगे ॥ ४ ॥
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी । एका जनार्दनीं तेचि भले ॥ ५ ॥
१८
न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मण्डुकीं वटवट तैसे ते गा ॥ १ ॥
प्रेमावीण भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥ २ ॥
कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव । भावावीण देव कैसा पावे ॥ ३ ॥
अनुतापेवीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहें शोधूनियां ॥ ४ ॥
पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥ ५ ॥
१९
परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥ १ ॥
घडीघडी काळ वाट याची पाहे । अजून किती आहे अवकाश ॥ २ ॥
हाचि अनुताप घेऊन सावध । कांहीं तरी बोध करीं मना ॥ ३ ॥
एक तास उरला खट्वांग रायासी । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥ ४ ॥
सांपडला हरि तयाला साधनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
२०
करा रे बापांनो साधन हरीचें । झणीं करणीचें करूं नका ॥ १ ॥
जेणें बा न ये जन्म यमाची यातना । ऐशिया साधना करा कांहीं ॥ २ ॥
साधनाचें सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥ ३ ॥
कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरि नाम जपतां घडे ॥ ४ ॥
एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरूप ॥ ५ ॥
२१
बारा सोळा जणी हरीसी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ॥ १ ॥
सहस्र मुखांचा वर्णितां भागला । हर्ष जया झाला तेणें सुखें ॥ २ ॥
वेद जाणूं गेला पुधें मौनावला । तें गुह्य तुजला प्राप्त कैंचें ॥ ३ ॥
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सद्गुरूचा तोचि जाणे ॥ ४ ॥
जाणते नेणते हरीचे ठिकाणीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
२२
पिंडीं देहस्थिती ब्रह्मांडीं पसारा । हरिविण सार व्यर्थ भ्रम ॥ १ ॥
शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । हरिसी जाणोनि हरिच झाले ॥ २ ॥
या रे या रे धरूं हरिनाम तारूं । भवाचा सागरू भय नाहीं ॥ ३ ॥
साधुसंत गेले आनंदीं राहिले । हरिनामें झाले कृतकृत्य ॥ ४ ॥
एका जनार्दनीं मांडिलें दुकान । देतो मोलावीण सर्व वस्तु ॥ ५ ॥
२३
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥ १ ॥
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥ २ ॥
सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥ ३ ॥
जैसी स्थिति आहे तैशापरी राहें । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥ ४ ॥
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश झाला ॥ ५ ॥
२४
दुर्बळाची कन्या समर्थाने केली । अवदसा निमाली दरिद्राची ॥ १ ॥
हरिकृपा होतां भक्तां निघती दोंदें । नाचती स्वानंदें हरिरंगीं ॥ २ ॥
देव भक्त दोन्ही एकरूप झाले । मुळींच संचलें जैसें तैसें ॥ ३ ॥
पाजळली ज्योती कापुराची वाती । ओवाळितां आरती भेद नुरे ॥ ४ ॥
एका जनार्दनीं कल्पेंची मुराला । तोचि झाला ब्रह्मरूप ॥ ५ ॥
२५
मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥ १ ॥
कानीं जें पेरिलें डोळां तें उगवलें । व्यापकें भारले तोचि हरि ॥ २ ॥
कर्म-उपासना-ज्ञानमार्गीं झाले । हरिपाठीं आले सर्व मार्ग ॥ ३ ॥
नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥ ४ ॥
झाला हरिपाठ बोलणें येथूनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
॥ इति श्री एकनाथ हरिपाठ समाप्त ॥
४ तुकाराममहाराजकृत हरिपाठाचे अभंग
१
नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥ १ ॥
गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥ २ ॥
गुरुराया तुजाइसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥ ३ ॥
तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥ ४ ॥
२
पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाहीं दुजें ॥ १ ॥
केशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ॥ २ ॥
माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ॥ ३ ॥
नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ॥ ४ ॥
तुका म्हणे एका नामीं भाव । राहे होय साह्य पांडुरंग ॥ ५ ॥
३
अयोध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हे द्वारका माया सत्य ॥ १ ॥
मोक्ष पुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे । प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ॥ २ ॥
नित्य नित्य मनीं हरि आठवावा । तेणेंचि तरावा भवसिंधु ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा । राहील जो नेमा तोचि धन्य ॥ ४ ॥
४
यमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ॥ १ ॥
नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे । नाहीं भय साचें प्राणियासी ॥ २ ॥
जयाचे संगती प्राणी उद्धरती । दर्शनेंच होती मुक्ति प्राप्त ॥ ३ ॥
तुका म्हणे नामीं एकनिष्ठ भाव । तेथें वासुदेव सर्व काळ ॥ ४ ॥
५
प्रातःकाळीं नाम पवित्रचि घ्यावें । तेणें विसरावें जन्ममृत्यु ॥ १ ॥
नळ युधिष्ठिर जनक जनार्दन । स्मरणेंचि धन्य होती प्राणी ॥ २ ॥
न करा आळस नाम घेतां वाचे । नाहीं भय साचें प्राणियांसी ॥ ३ ॥
तुका म्हणे वाचें गाईल गोविंद । होईल परमानन्द नामें एका ॥ ४ ॥
६
कश्यप गौतम भारद्वाज अत्री । ऋषि विश्वामित्र नाम थोर ॥ १ ॥
जमदग्नि मुनि वसिष्ठ वर्णिला । तिन्हीं लोकीं झाला वंद्य एक ॥ २ ॥
नाम घेतां नुरे पाप ताप दैन्य । होय थोर पुण्य उच्चारितां ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐसी उच्चारितां वाणी । तेथें अंतःकरणीं सुख होय ॥ ४ ॥
७
अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी । मुख्य मंदोदरी पतिव्रता ॥ १ ॥
नामें घेतां त्यांची वाणी हे पवित्र । होय कुळगोत्र उद्धरण ॥ २ ॥
संकल्प विकल्प सांडोनियां दुरी । वाचे हरि हरी उच्चारावे ।न् ॥ ३ ॥
नाहीं बद्धकता तया संसाराची । जाचणी यमाची मग कैंची ॥ ४ ॥
८
व्यास अंबरीष वसिष्ठ नारद । शौनक प्रल्हाद भागवत ॥ १ ॥
नित्य स्मरण करी यांचें जरी प्राणी । पुन्हां नाहीं खाणी चौंऱ्याशींची ॥ २ ॥
शुक पराशर मुनि पुंडलीक । अर्जुन वाल्मीक नाम गाती ॥ ३ ॥
बली बिभीषण भीष्म रुक्मांगद । बकदाल्भ्य शुद्ध महाऋषि ॥ ४ ॥
तुका म्हणे यांचीं नामें येतां वाणीं । प्रत्यक्ष तो प्राणी देवाऐसा ॥ ५ ॥
९
गीता भागवत वेद उच्चारितां । पापाची तों वार्ता कोठें राहे ॥ १ ॥
सकळ वासना नामीं जे रंगली । साधनें राहिली मग कैंची ॥ २ ॥
म्हणोनिया नेम ऐसा तारी जीवा । होय तोचि देवा आवडता ॥ ३ ॥
उगवला दिवस जाय तो क्षणांत । विचारूनि हित वेगीं करा ॥ ४ ॥
तुका म्हणे स्मरा वेगीं विठोबासी । न धरा मानसीं दुजें कांहीं ॥ ५ ॥
१०
तीर्थांचें जें मूळ व्रतांचें जें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरीये ॥ १ ॥
तें आम्हीं देखिलें आपुले नयनीं । फिटलीं पारणीं लोचनांचीं ॥ २ ॥
जिवींचा जिव्हाळा सुखाचा शेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥ ३ ॥
जगाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभपर दुष्टां काळ ॥ ४ ॥
सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तोचि असे ॥ ५ ॥
तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें । आम्हां सांपडलें गीतीं गातां ॥ ६ ॥
११
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥ १ ॥
कस्तुरी मळकट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ २ ॥
मुकुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतिलें सकळही ॥ ३ ॥
कांसे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सावळा बाइयांनो ॥ ४ ॥
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥ ५ ॥
१२
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले ॥ १ ॥
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ २ ॥
लांचावलें मन लागलीसे गोडी । ते जीवें न सोडी ऐसें झालें ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥ ४ ॥
१३
शंख चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती दोन्हीं कानीं ॥ १ ॥
मस्तकीं मुकुट नवरत्नहार । वरी पीतांबर पांघुरला ॥ २ ॥
रत्नहिरेजडित कटीं कडदोरा । रम्य शोभे हिरा बेंबीपाशी ॥ ३ ॥
जडित कंकण कर्णी शोभे मुद्रिका । लाचावला तुका भेटीसाठीं ॥ ४ ॥
१४
नेणें जप तप योग युक्ति ध्यान । करितां चिंतन रात्रंदिवस ॥ १ ॥
नेणें कांहीं देवा झालों उतराई । मागें लागों पाहीं बाळ जैसा ॥ २ ॥
भाव-गंगोदकें आम्ही शुद्ध पाहें । प्रक्षाळिले पाय विटेसहित ॥ ३ ॥
जन्मली जान्हवी ज्या ठायीं उत्तम । हारावया श्रम भाविकांचे ॥ ४ ॥
तुका म्हणे आम्ही झालों पुण्यवंत । सेविलें अमृत रामतीर्थ ॥ ५ ॥
१५
परिमळमिश्रित करूनि उटणें । नारायण तेणें तोषविला ॥ १ ॥
पय घृत दहि मधु ते शर्करा । गोशृंगधारा अखंडित ॥ २ ॥
करोनि संयुक्त ओपियली ईशा । पंचामृतें तैशी पंचविधि ॥ ३ ॥
तुका म्हणे जेथें गंगे जन्म झाला । प्रसाद दिधला आम्हालागी ॥ ४ ॥
१६
आपुलिया घरीं कष्ट तरी करीं । आणोनि घागरी गंगोदक ॥ १ ॥
करोनि विनंती विनवितो तुम्हां । स्नान पुरुषोत्तमा करा वेगीं ॥ २ ॥
उत्तम वस्त्रानें पुसावें तें अंग । करोनि अभ्यंग सर्वांगासी ॥ ३ ॥
परिधान वस्त्रें केलें पीतांबरें । तेणें हें साजिरें रूप दिसे ॥ ४ ॥
तुका म्हणे नेत्र पाहतां निवाले । ध्यान संचारलें हृदयामाजीं ॥ ५ ॥
१७
मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा । पुनरपि संसारा येणें नाहीं ॥ १ ॥
मन हें सेवंती अर्पूनी भगवंतीं । पुनरपि संसृती येणें नाहीं ॥ २ ॥
मन हें तुळसी अर्पूनी हृषीकशी । पुनरपि जन्मासी येणे नाहीं ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तया वास व्हावा वैकुंठासी ॥ ४ ॥
१८
नामपुष्प शुद्ध गळां घाला हार । विवेक सारासार तुरा लावूं ॥ १ ॥
बोध भाळीं बुका क्षमा तुलसीदळ । वाहतां गोपाळ संतोषतो ॥ २ ॥
गाइलीया गुण संतोषें तयानें । करितां कीर्तनें आल्हादे तो ॥ ३ ॥
आल्हादे हा देव कीर्ति वाखाणितां । पवाडे सांगतां याचे यास ॥ ४ ॥
याचे यास करूं सर्व निवेदन । वारील हा शीण संसारींचा ॥ ५ ॥
संसाराचा वारा लागों नेदी अंगा । भावे पांडुरंगा आळवितो ॥ ५ ॥
तुका म्हणे आतां उजळली आरती । भावें तो श्रीपती ओंवाळूंया ॥ ७ ॥
१९
शब्दाचिया भावें केला उपचार । तेणें सर्वेश्वर संतोषला ॥ १ ॥
शब्दाचिया करें करविलें भोजन । धाला नारायण तेणें सुखें ॥ २ ॥
शब्दाचिया करें करविले आचमन । तांबूल अर्पून फळें पुष्पें ॥ ३ ॥
तुका म्हणे अन्नाआधी धूपदीप । उपचार अल्प समर्पिले ॥ ४ ॥
२०
मजलागीं नाहीं ज्ञानाची ती चाड । वाचे घेत गोड नाम तुझें ॥ १ ॥
नेणतें लेकरुं आवडीचें नातें । बोले वचनातें आवडीनें ॥ २ ॥
भक्तिविण कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥ ३ ॥
तुका म्हणे नाचूं निर्लज्ज होउनी । नाहीं मझे मनीं दुजा भाव ॥ ४ ॥
२१
पूजूं नारायण शब्दाचे सुमनें । मंत्रपुष्प तेणें वाहियेलें ॥ १ ॥
भावाचे पैं हातीं जोडुनी ओंजळ । समर्पिलें जळ शुद्ध भावें ॥ २ ॥
मुखशुद्धी तांबूल दिलें तुळसीदल । आनंद सकळ ओसंडला ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां उरलें नाहीं । नामाविण कांहीं बोलावया ॥ ४ ॥
२२
समाधान चित्ताचें चरणा आलिंगन । पायावरी मन स्थिरावलें ॥ १ ॥
जैसें केलें तैसें घालूं लोटांगणा । करूं प्रदक्षिणा नमस्कार ॥ २ ॥
प्रार्थितों मी तुज राहें माझें पोटीं । हृदयसंपुटीं देवराया ॥ ३ ॥
क्षेम आलिंगन दिली पयीं मिठी । घेतलीसे लुटी अमूप हो ॥ ४ ॥
तुका म्हणे आतां आनंदीआनंद । गाऊं परमानंद मनासंगें ॥ ५ ॥
२३
काय उपचार करूं पांडुरंगा । हेंचि मज सांगा विचारूनी ॥ १ ॥
कोणता पदार्थ उणा तुजपासी । बोलाया वाचेशीं मौन पडे ॥ २ ॥
शंकर-शेषादि करिती स्मरण । तेथें माझें मन गाऊं शके ॥ ३ ॥
इंद्र सुरवर वाहती सुमनें । तेथें म्यां वाहणे ।न् काय एक ॥ ४ ॥
परीं आवडीनें जोडूनी ओंजळ । बुका वाहूं माळ तुळसीची ॥ ५ ॥
उणें पुरें तुम्ही करूनियां सांगा । जिवालागीं मग सुख तेव्हां ॥ ६ ॥
तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना । तुम्ही नारायणा सेवकाची ॥ ७ ॥
२४
कैसें करूं ध्यान कैसा पाहूं तुज । वर्म दावी मज याचकासी ॥ १ ॥
कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ २ ॥
कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षीं जाणूं । जाणुं हा कवणूं कैसा तुज ॥ ३ ॥
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी स्थिति मति न कळे मज ॥ ४ ॥
तुका म्हणे जैसें दास केलें देवा । तैसें हें अनुभवा आणीं मज ॥ ५ ॥
२५
काय तुज कैसें जाणावें गा देवा । आणावे अनुभवा कैशापरी ॥ १ ॥
सगुण निर्गुण स्थूल कीं लहान । न कळे अनुमान मज तुझें ॥ २ ॥
कोणता निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तारावया ॥ ३ ॥
तुका म्हणे कैसें पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥ ४ ॥
२६
स्तुती करूं तरी कोण माझी मती । वेदां पडे भ्रांति हें आश्चर्य ॥ १ ॥
परी हा जिव्हाग्रीं रामकृष्णहरी । बैसवीं लौकरी यातीगुण ॥ २ ॥
रूप गुण कीर्ति कृपाळू उदार । वर्णावया पार ब्रह्मा नेणे ।न् ॥ ३ ॥
रूपीं नामीं शिव होऊनिया वेडा । वर्णिला पवाडा रामनामीं ॥ ४ ॥
तुका म्हणे मज नेणवेचि शिव । नाहीं राहिला वाव बोलावया ॥ ५ ॥
२७
नामाचा प्रताप न वर्णवेचि मज । सांग गरुडध्वज राहे तेथें ॥ १ ॥
मम वाचा किती परतल्या श्रुती । वेद मुखें श्रुती मौन ठेले ॥ २ ॥
वर्णूं नेणें शेष नामाचा पवडा । चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या ॥ ३ ॥
अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी । पायांची किंकरी होऊनि ठेली ॥ ४ ॥
तुका म्हणे आम्ही मानव किंकर । वर्णावया पार न कळे तुझा ॥ ५ ॥
२८
आम्हीं मानवानी वर्णावें तें काय । सुरवर पाय वंदिताती ॥ १ ॥
गणेश शारदा करिती गायन । आदिदेव गण श्रेष्ठ श्रेष्ठ ॥ २ ॥
जयाच्या गायना तिष्ठतो शंकर । तयासी पैं पार न कळे तुझा ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची ती मती नागविली ॥ ४ ॥
२९
अगा महाविष्णु अनंत भुजांच्या । आम्हां अनाथांच्या सोयरीया ॥ १ ॥
न कळे महिमा वेद मौनावती । तेथें माझी मति कोणीकडे ॥ २ ॥
काय म्यां वर्णावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना शक्ति नव्हे ॥ ३ ॥
रविशशी जेथें तेजें सामावती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ ४ ॥
तुका म्हणे आम्ही बाळ तूं माऊली । करावी साउली करुणेची ॥ ५ ॥
३०
नमो विश्वरूपा अगा मायबाप । अपारा अमूपा पांडुरंगा ॥ १ ॥
विनवितो रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावे ॥ २ ॥
तुझी स्तुती वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेति नेति ॥ ३ ॥
ऋशि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णितां तुझे गुण न सरती ॥ ४ ॥
तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ति देवा ॥ ५ ॥
३१
विनविजे ऐसे भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥ १ ॥
धीटपणे पत्र लिहिलें आवडी । पार नेणें थोडी मति माझी ॥ २ ॥
जेथें वेदां तुझा न कळेचि पार । तेथें मी अपार काय वानूं ॥ ३ ॥
जैसे तैसे माझे बोल अंगिकारी । बोबड्या उत्तरी गौरवितो ॥ ४ ॥
तुका म्हणे विटेवरी जीं पाऊलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥ ५ ॥
३२
त्रिगुण आटीव वाचेचा पसारा । पडेल विचार सर्व रस ॥ १ ॥
आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळुनी गेलें ॥ २ ॥
रामकृष्ण नाम माळ ही साजिरी । ओंविली गोजिरी कर्णीं मनी ॥ ३ ॥
तुका म्हणे तनु झाली हे शीतल । आवडी सकळ ब्रह्मानंदें ॥ ४ ॥
३३
इतुकें करीं देवा ऐकें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥ १ ॥
इतुकें करीं देवा आइकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ २ ॥
इतुकें करीं देवा विनवितों तुज । संतचरण रज वंदी माथां ॥ ३ ॥
इतुकें करी देवा आइकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥ ४ ॥
भलतियां भावें तारी पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥ ५ ॥
॥ इति श्रीतुकाराम हरिपाठ समाप्त ॥
५ श्रीनिवृत्तिमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
१
हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचे ॥ १ ॥
रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामें तृप्ती जाली आम्हां ॥ २ ॥
नामाचेनि स्मरणें नित्य पैं सुखांत । दुजीयाची मात नेणो आम्ही ॥ ३ ॥
निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं केशीराज ॥ ४ ॥
२
हरिविण चित्तीं न धरीं विपरीत । तरताती पतित रामनामें ॥ १ ॥
विचारुनी पाहा ग्रंथ हे अवघे । जेथें तेथें सांग रामनाम ॥ २ ॥
व्यासादिक भले रामनामापाठीं । नित्यता वैकुंठीं तयां घर ॥ ३ ॥
शुकादिक मुनि विरक्त संसारीं । रामनाम निर्धारीं उच्चारिलें ॥ ४ ॥
चोरटा वाल्मीकि रामनामीं रत । तोही एक तरत रामनामीं ॥ ५ ॥
निवृत्ति साचार रामनामी दृढ । अवघेचि गूढ उगविले ॥ ६ ॥
३
हरिमार्ग सार येणेंचि तरिजे । येरवीं उभिजे संसार रथ ॥ १ ॥
जपतां श्रीहरी मोक्ष नांदे नित्य । तरेल पैं सत्य हरि नामें ॥ २ ॥
काय हें ओखद नामनामामृत । हरिनामें तृप्त करी राया ॥ ३ ॥
निवृत्ति साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ॥ ४ ॥
४
एकेविण दुजें नाहीं पैं ये सृष्टी । हें ध्यान किरीटी दिधलें हरी ॥ १ ॥
नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला । द्वैताचा अबोला तया घरीं ॥ २ ॥
हरीविणें देवो नाहीं नाहीं जनीं । अखंड पर्वणी हरी जपतां ॥ ३ ॥
निवृत्ति साकार हरिनाम पाठ । नित्यता वैकुंठ हरिपाठ ॥ ४ ॥
५
जपतां कुंटिणी उतरे विमान । नाम नारायण आलें मुखा ॥ १ ॥
नारायण नाम तारक तें आम्हां । नेणों पैं महिमा अन्य तत्त्वीं ॥ २ ॥
तरिले पतित नारायण नामें । उद्धरिले प्रेमें हरिभक्त ॥ ३ ॥
निवृत्ति उच्चार नारायण नाम । दिननिशी प्रेम हरी हरी ॥ ४ ॥
६
एक तत्त्व हरि असे पैं सर्वत्र । ऐसें सर्वत्र शास्त्र बोलियलें ॥ १ ॥
हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरें । वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ॥ २ ॥
जपता पैं नाम यमकाळ कांपे । हरी हरी सोपें जपिजे सुखें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे हरिनामपाठ जपा । जन्मांतर खेपा अंतरती ॥ ४ ॥
७
गगनींचा घन जातो पैं वारेन । अवचिता पतन अधोपंथें ॥ १ ॥
अध ऊर्ध्व हरि भाविला दुसरी । प्रपंचबोहरी आपोआप ॥ २ ॥
निवृत्ति म्हणे जन हरीचें स्वरूप । कळाचें पैं माप हरिनाम ॥ ३ ॥
८
सृष्टीच्या संमता सुरतरु तरु । बोलिला विस्तारु धर्मशास्त्रीं ॥ १ ॥
नेघों हें तरु प्रपंचपरिवारु । प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा ॥ २ ॥
निवृत्ति निवांत हरीच सेवित । दो अक्षरीं उचित इंद्रिया ॥ ३ ॥
९
सर्वांभूतीं दया शांती पैं निर्धार । योग साचार जनीं इये ॥ १ ॥
न लगे मुंडण काया हें दंडणें । अखंड कीर्तन स्मरे हरी ॥ २ ॥
शिव जाणें जीवीं रक्षला चैतन्य । हे जीवीं कारुण्य सदा भावीं ॥ ३ ॥
गगनीं सूर्य तपे अनंत तारा लोपे । एकची स्वरूपें आत्मा तैसा ॥ ४ ॥
उगवला कळीं उल्हासु कमळीं । तैसा तो मंडली चंद्र लेखा ॥ ५ ॥
निवृत्तिमंडळ अमृत सकळ । घेतलें रसाळ हरिनाम ॥ ६ ॥
१०
जयाचेनि सुखें चळत पैं विश्व । नांदे जगदीश सर्वा घटीं ॥ १ ॥
त्याचें नाम हरी त्याचें नाम हरी । प्रपंचबोहरी कल्पनेची ॥ २ ॥
शांति त्याची नारी प्रकृति विकारी । उन्मनी बोवरी हृदयांतु ॥ ३ ॥
निवृत्तिदेवीं साधिली राणीव । हरपले भाव इंद्रियांचे ॥ ४ ॥
११
हरीविण भावो वायांचि संदेहो । हरि देवो देवो आहे सत्य ॥ १ ॥
हरी हरी वाचे ऐसें जपा साचें । नाहीं त्या यमाचे मोहजाळ ॥ २ ॥
हरीविण सार नाहीं पैं निर्धार । हरिविण पार न पाविजे ॥ ३ ॥
निवृत्ति श्रीहरि चिंती निरंतरीं । हरि एक अंतरीं सर्वीं नांदे ॥ ४ ॥
१२
ध्यान धरा हरी विश्रांति नामाची । विठ्ठलींच साची मनोवृत्ति ॥ १ ॥
ध्यानेविण मन विश्रांतिविण स्थान । सूर्याविण गगन शून्य दिसे ॥ २ ॥
नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ति । प्रपंच समाप्ति ती अक्षरीं ॥ ३ ॥
निवृत्ति समता विठ्ठल कीर्तन । करितां अनुदीन मन मेळे ॥ ४ ॥
१३
प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज । आम्हां बोलता लाज येत सये ॥ १ ॥
काय करूं हरी कैसां हा गवसे । चंद्रसूर्य अंवसे एकसूत्र ॥ २ ॥
तैसें करूं मन निरंतर ध्यान । उन्मनी साधन आम्हां पुरे ॥ ३ ॥
निवृत्ति हरिपाठ नाम हेंचि वाट । प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥ ४ ॥
१४
लटिका संसार वाढविसी व्यर्थ । विषयाचा स्वार्थ क्षणें करीं ॥ १ ॥
नको शिणों दुःखे का भरिसी शोकें । एकतत्त्वें एकें मन लावीं ॥ २ ॥
लावीं उन्मनीं टाळी टाळिसी नेई बाळी । अखंड वनमाळी हृदयवटी ॥ ३ ॥
निवृत्ति चपळ राहिला अचळ । नाहीं काळ वेळ भजतां हरी ॥ ४ ॥
१५
कल्पना काजळी कल्पिले कवळी । कैसेनि जवळीं देव होय ॥ १ ॥
टाकी हे कल्पना दुरित वासना । अद्वैत नारायणा भजें कां रे ॥ २ ॥
मोहाच्या जीवनीं नको करूं पर्वणी । चिंती कां आसनीं नारायण ॥ ३ ॥
निवृत्ति अवसरु कृष्णनाम पैं सारु । कल्पना साचारु हरी झाला ॥ ४ ॥
१६
मोहाचेनि देठें मोहपाश गिळी । कैसेनि गोपाळीं सरता होय ॥ १ ॥
मोहाचेनि मोहनें चिंतितां श्रीहरी । वाहिजु भीतरीं अवघा होय ॥ २ ॥
दिननिशीं नाम जपतां श्रीहरीचें । मग या मोहाचें मोहन नाहीं ॥ ३ ॥
निवृत्ति आगम मोहन साधन । सर्व नारायण एका तत्त्वें ॥ ४ ॥
१७
तिमिरपडळें प्रपंच हा भासे । झाकोळला दिसे आत्मनाथ ॥ १ ॥
हरीविण दुजें चिंतितां निभ्रांत । अवघेंचि दिसत माया भ्रम ॥ २ ॥
सांडूनि तिमिर सर्व नारायण । हेंचि पारायण नित्य करी ॥ ३ ॥
निवृत्ति सज्जन अवघा आत्मराज । एकतत्त्व बीज नाम लाहो ॥ ४ ॥
१८
प्रवृत्ति निवृत्ति या दोन्ही जनीं । वनीं काज करुनी असती ॥ १ ॥
नारायण नाम जपतांचि दोन्ही । एकतत्त्वीं करणी सांगिजे गुज ॥ २ ॥
आशेचे विलास गुंफोनिया महिमा । सत्त्वीं तत्त्व सीमा निजज्ञाने ॥ ३ ॥
निवृत्ति तत्त्वतां मनाचे मोहन । नित्य समाधानें रामनामें ॥ ४ ॥
१९
क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञवृत्ति । अवघी हे क्षिती एकरूपें ॥ १ ॥
शांति दया पैसे क्षमा जया रूप । अवघेची स्वरूप आत्माराम ॥ २ ॥
निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा । सांडूनियां भजा केशवासी ॥ ३ ॥
निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त । अवघींच समस्त गिळियेलीं ॥ ४ ॥
२०
आम्ही चकोर हरि चंद्रमा । आम्ही कळा तो पौर्णिमा ॥ १ ॥
कैसा बाहिजु भीतरी हरी । बिंब बिंबला एक सूत्रीं ॥ २ ॥
आम्ही देही तो आत्मा । आम्ही विदेही तो परमात्मा ॥ ३ ॥
ऐक्यपणें सकळ वसे । द्वैतबुद्धी कांहीं न दिसे ॥ ४ ॥
निवृत्ति चातक इच्छिताहे । हरिलागीं बरें तें पाहे ॥ ५ ॥
२१
ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता । तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १ ॥
नामचेनि बळे कळिकाळ आपणा । ब्रह्मांडा येसणा तोचि होय ॥ २ ॥
न पाहे तयाकडे काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ॥ ३ ॥
निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामे । नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४ ॥
२२
नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १ ॥
रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥ २ ॥
ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३ ॥
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपे । नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४ ॥
२३
अखंड जपतां रामनाम वाचे । त्याहूनी दैवाचे कोण भूमी ॥ १ ॥
अमृतीं राहिले कैचें मरण । नित्यता शरण हरिचरणा ॥ २ ॥
नाममंत्र रासी अनंत पुण्य त्यासी । नाहीं पैं भाग्यासी पार त्याच्या ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे सार रामनाम मंत्र । कैंचा त्यासी शत्रु जिती जनीं ॥ ४ ॥
२४
नाम नाहीं वाचे तो नर निर्दैव । कैसेनि देव पावेल तया ॥ १ ॥
जपे नाम वाचें रामनाम पाठें । जाशील वैकुंठे हरी म्हणता ॥ २ ॥
न पाहे पैं दृष्टीं कळिकाळ तुज । रामनाम बीज मंत्रसार ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे नाम जपावें नित्यता । आपणचि तत्त्वतां होईल हरी ॥ ४ ॥
२५
नामाचेनि बळें तारिजे संसार । आणिक विचार करूं नको ॥ १ ॥
नाम जप वेगीं म्हणे हरी हरी । प्रपंच बोहरी आपोआप ॥ २ ॥
नित्यता भजन देवद्विज करी । नाम हे उच्चारि रामराम ॥ ३ ॥
निवृत्ति जपतु राम राम वाचे । दहन पापाचें आपोआप ॥ ४ ॥
॥ इति श्रीनिवृत्तिनाथ हरिपाठ समाप्त ॥
Encoded and proofread by Sunder Hattangadi sunderh at hotmail.com
% Text title : pa.ncharatna haripaaTha
% File name : haripatha.itx
% itxtitle : haripATha (paMcharatna)
% engtitle : haripatha
% Location : marathi
% Author : Saints:Nivritti,Jnaneshvar,Ekanath,Namdev,Tukaram
% Language : Marathi
% Subject : philosophy/hinduism/bhaktiyoga
% Transliterated by : Sunder Hattangadi(sunderh@hotmail.com)
% Proofread by : Sunder Hattangadi(sunderh@hotmail.com)
% Description/comments : Abhangas (inspired poetry) by the saints of Maharashtra
% Indexextra : NONE
% Acknowledge-Permission:
% Latest update : Sept. 8, 1998, December 27, 2015
% Send corrections to : (sanskrit at cheerful dot c om)
% Site access : https://sanskritdocuments.org
%-----------------------------------------------------
% The text is prepared by volunteers and is to be used for personal study
% and research. The file is not to be copied or reposted for promotion of
% any website or individuals or for commercial purpose without permission.
% Please help to maintain respect for volunteer spirit.
%--------------------------------------------------------
From https://sanskritdocuments.org
Questions, comments? Write to (sanskrit at cheerful dot c om) .